२४ मार्च नंतर नोकरी गमावलेल्यांना सरकार देणार अर्धा पगार

नवी दिल्ली, १३ सप्टेंबर २०२०: कोरोनानं भारतीय अर्थव्यवस्थेचं कंबरड मोडलं आहे. या साथीनं प्रत्येक घटकाला आर्थिक धक्का दिला आहे. रोजगार आघाडीवर सर्वांत मोठे संकट अधिक खोलवर उभं राहिलं आहे. विशेषत: खासगी क्षेत्रातील बेरोजगारांची संख्या वाढत आहे.

एका अंदाजानुसार, कोरोनाच्या संकटामुळं आतापर्यंत सुमारे १.९ कोटी लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. एकट्या जुलै महिन्यातच ५० लाख लोक बेरोजगार झाले. ही आकडेवारी चिंताजनक आहे, कारण कोरोना संकटाच्या अगोदरच रोजगाराची आकडेवारी चिंताजनक होती.

आता मोदी सरकारनं बेरोजगार औद्योगिक कामगारांना दिलासादायक बातमी आणली आहे. अशा कामगारांच्या पगाराच्या निम्म्या पगाराची भरपाई करण्याची सरकारनं जाहीर केलं आहे. सरकारच्या म्हणाण्यानुसार तब्बल ४२ लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल. आता ज्यांनी महामारीच्या काळात नोकरी गमावली त्यांना बेरोजगारी भत्ता मिळणार आहे.

खरं तर, लोकांच्या रोजीरोटीवरचं संकट टाळण्यासाठी कामगार मंत्रालयानं अटल विमा धारक व्यक्ति कल्याण योजनेंतर्गत मदत वाढविण्याच्या निर्णयाला अधिसूचित केले आहे. याद्वारे, कर्मचारी राज्य विमा कॉर्पोरेशन (ईएसआयसी) मध्ये नोंदणीकृत कामगारांना ५०% बेरोजगारीचा लाभ मिळेल.

म्हणजेच, कोरोना संकटात नोकरी गमावलेल्या औद्योगिक कामगारांना तीन महिन्यांसाठी पन्नास टक्के पगार बेरोजगारीचा लाभ दिला जाईल. या वर्षाच्या २४ मार्च ते ३१ डिसेंबर दरम्यान ज्या कामगारांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत त्यांना हा लाभ देण्यात येईल.

कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) कामगारांना ही सुविधा दिली जाईल. ते तीन महिन्यांच्या सरासरी पगाराच्या ५०% हक्क सांगू शकतात. पूर्वी ही मर्यादा २५ टक्के होती, जी कोरोना संकटामुळं वाढवून ५० टक्के केली गेली आहे.
अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजना ही कर्मचारी राज्य विमा महामंडळ अर्थात ईएसआयसी द्वारा संचालित एक योजना आहे. ही योजना १ जुलै २०२० पासून एका वर्षासाठी वाढविण्यात आली आहे. ती ३० जून २०२१ पर्यंत प्रभावी राहील. तथापि, १ जानेवारी २०२१ मधील मूळ तरतुदी पुनर्संचयित केल्या जातील.

ही सुविधा मिळण्यासाठी कामगार कोणत्याही ईएसआयसी शाखेत जाऊन अर्ज करू शकतात, अर्ज तपासल्यानंतर बँकेचा दावा हक्क मिळाल्यावर अर्धा पगार दिला जाईल. ही रक्कम कामगारांच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल. त्यासाठी आधार क्रमांकाची मदत घेतली जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा