पुणे, २९ जून २०२३: सध्या आर्थिक दुरावस्थेतून बाहेर आलेल्या ‘बीएसएनएल’ला आगामी पाच वर्षांमध्ये निव्वळ नफ्यामध्ये आणण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले असुन याचाच एक भाग म्हणजे, पहिल्या टप्प्यात २०२० मध्ये कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली होती, आता त्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणून ‘भारत संचार निगम लिमिटेड’च्या (बीएसएनएल) वापरामध्ये नसलेल्या जमिनींची विक्री करण्यात येणार आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये बीएसएनएलच्या १५ हजार जमिनी आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात दोन हजार जमिनींची विक्री करण्यात येणार आहे. अशा गोष्टींमधून गेल्या तीन वर्षांपासून ‘बीएसएनएल’ला थोडा थोडा नफा होत आहे.
बीएसएनएलच्या सर्वाधिक जमिनी महाराष्ट्रात असून या सगळ्या विक्रीतून साधारण दहा हजार कोटी रुपये उत्पन्न मिळू शकेल. महाराष्ट्रात वापरात नसलेल्या ८० जागा आहेत. ‘एमटीएनएल’ आणि ‘बीएसएनएल’ यांच्या विलीनीकरणाबद्दल सध्या कोणताही निर्णय झालेला नाही. ‘एमटीएनएल’वर सध्या २९ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. अशा परिस्थितीत ‘बीएसएनएल’मध्ये विलीनीकरण केल्यास ते कर्ज फेडण्याची आमची क्षमता नाही, असेही बीएसएनएलचे मनुष्यबळ विकास विभाग, संचालक अरविंद वडनेरकर यांनी सांगितले.
पुण्यामध्ये वापरात नसलेल्या २२ जागा आहेत. लोणावळा, गुलटेकडी आणि घोरपडी येथील अशा तीन जागा विक्रीसाठी निश्चित केल्याची माहितीही अरविंद वडनेरकर यांनी दिली.
न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे.