तमिळनाडू, ११ जून २०२१: आजकालची अनेक लग्न चर्चेचा विषय होताना दिसत आहेत. तमिळनाडूच्या सालेम जिल्ह्यातून असेच एक प्रकरण समोर आले आहे जिथे लग्न चर्चेचा विषय बनले आहे. वधू-वरांच्या अनोख्या नावांमुळे हे लग्न चर्चेत आहे. या लग्नात वराचे नाव ‘समाजवाद’ आणि वधूचे नाव ‘ममता बॅनर्जी’ ठेवण्यात आलंय.
वास्तविक हे लग्न तमिळनाडूच्या सालेम जिल्ह्यात होत आहे. इथे ‘समाजवाद’ चे लग्न ‘ममता बॅनर्जी’ बरोबर ठरले आहे. जेव्हा या लग्नाचे आमंत्रण कार्ड सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा लोकांना हे समजले. हे आमंत्रण व्हायरल झाल्यानंतर या लग्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
समाजवाद नावाचा वर आणि ममता बॅनर्जी नावाच्या नववधूचे रविवारी लग्न होणार आहे. विशेष म्हणजे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (सीपीआय) जिल्हा सचिव ए. मोहन यांच्या मुलाचे नाव समाजवाद आहे आणि हे लग्न त्यांचेच होत आहे.
समाजवाद हा मोहन यांचा तिसरा मुलगा आहे. कम्युनिझम आणि लेनिनवाद अशी त्याच्या इतर दोन मुलांची नावे आहेत. २०१६ मध्ये कम्युनिस्ट कुटुंबातील असलेले मोहन यांनी जन कल्याण आघाडीच्या वतीने वीरपांडी मतदारसंघातून निवडणूक लढविली.
मोहन यांचे कुटुंब सीपीआयचे कट्टर समर्थक आहे, आता त्यांच्या मुलांबरोबरच सुनेला देखील तेच नाव प्राप्त झाले आहे. वधूबद्दल बोलायचे झाले तर ती मोहन यांच्या नातेवाईकाची मुलगी आहे. वधूचे कुटुंब कॉंग्रेसचे समर्थक असून तिचे नाव ममता बॅनर्जी आहे.
सध्या हे लग्न केवळ तमिळनाडूमध्येच नाही तर संपूर्ण देशात प्रसिद्ध झाले आहे. वधू-वर यांचे नावही प्रसिद्ध झाले आहे. आता रविवारी होणाऱ्या या लग्नात कोणकोणते पाहुणे उपस्थित राहू शकतात यावरही लोक चर्चा करू लागले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे