शेतीच्या विकासासाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन महत्त्वाचे

इंदापूर ,७ जुलै २०२० :इंदापूर तालुक्यातील बावडा गावात १ जुलै ते ७ जुलै दरम्यान कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी “कृषी संजीवनी सप्ताह” चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बावडा , लाखेवाडी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या कु. अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी लोकांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या,” शेतीच्या विकासासाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे”.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेली अतुलनीय कामगिरी लक्षात घेऊन स्व. वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत दरवर्षी एक जुलै हा कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
माजी मुख्यमंत्री स्व.वसंतरावजी नाईक यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये हरितक्रांती करून राज्याला खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण केले. तीच क्रांतीची ज्योत अखंड पेटती राहावी यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी हा कृषी संजीवनी सप्ताह भरवण्यात आला होता. हा सप्ताह दरवर्षी १ जुलै ते ७ जुलै दरम्यान भरवला जातो.

या सप्ताहात कृषी विभागातील सर्व अधिकारी गावोगावी जाऊन कार्यक्रम घेतात व तेथील शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना , फळबाग लागवड, पेरणी, पिकांचे एकात्मिक कीड व्यवस्थापन अशा सर्व गोष्टींबद्दल सखोल माहिती देतात . मंडल कृषी अधिकारी, बावडा कार्यालयामार्फत हा कार्यक्रम या वर्षी बावडा येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्या कु.अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थितीत राहून अधिकारी व शेतकरी यांच्याशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. अंकिता पाटील म्हणाल्या की,’ कृषी विभाग चांगले काम करत असून कृषी विभागातील अधिकारी,कर्मचारी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. कृषी विकासात कृषी विभागाची भूमिका अतिशय महत्त्वाची असून , त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी वर्गाला अधिकचे उत्पन्न मिळण्यास फायदा होईल.’ अंकिता पाटील यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.

मंडल कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना व प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन केले. कृषी सहायक हनुमंत बोडके यांनी ऊस पिकाचे कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यावे या बाबतीत मार्गदर्शन केले.

यावेळी सरपंच किरण पाटील ,उपसरपंच निलेश घोगरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब कोकणे, मंडळ कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे, कृषी अधिकारी सतीश महारनवर, कृषी पर्यवेक्षक देवानंद कोरटकर , कृषी सहाय्यक हनुमंत बोडके आणि अन्वर कलाल उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक अन्वर कलाल यांनी केले.

न्युज अनकट प्रतिनिधी:- योगेश कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा