जम्मू-काश्मीर, २३ डिसेंबर २०२०: जम्मू-काश्मीरच्या जिल्हा विकास परिषदेचा निकाल लागला आहे. परिणामी, सात पक्षांचा गुपकार गट सर्वात मोठी युती ठरली आहे. तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, गुपकार आघाडीला १०१ जागा मिळाल्या आहेत. गुपकार हे सात पक्षांची युती आहे, या युतीमध्ये नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी, पीपल्स कॉन्फरन्स, सीपीआय-सीपीआयएम, अवामी नॅशनल कॉन्फरन्स आणि जम्मू-काश्मीर पीपल्स मूव्हमेंट यांचा समावेश आहे. भाजपने ७५ जागा जिंकल्या आहेत. जम्मू-काश्मीर अपणी पार्टी ने ११ जागा जिंकल्या आहेत. कॉंग्रेस २५ जागा जिंकून तिसर्या क्रमांकावर असून अपक्षांनी आश्चर्यकारकपणे येथे ६६ जागा जिंकल्या आहेत.
या निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाने काश्मीरमध्ये आपले खाते उघडले आणि तीन जागा जिंकल्या. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० काढून टाकल्यानंतर या केंद्र शासित प्रदेशाची ही पहिली निवडणूक होती. आठ टप्प्यात घेण्यात आलेल्या जिल्हा विकास परिषदेची सुरुवात २८ नोव्हेंबरपासून झाली. या काळात एकूण २८० जागा लढवल्या गेल्या. २८० जागांपैकी १४० जागा जम्मू विभागात आणि १४० जागा काश्मीर विभागात आहेत.
जम्मू प्रदेशात भाजपा अपेक्षेप्रमाणे पुढे आले आहे. पक्षाला १० पैकी ६ जिल्ह्यांमध्ये बहुमत मिळाले आहे. पक्ष या जागांमध्ये आपले डीडीसी अध्यक्ष करेल. यात जम्मू, सांबा, कठुआ, उधमपूर, दोडा आणि रेसाई हे जिल्हे आहेत.
काश्मीर खोऱ्यातील निवडक निकालांमुळे कमळ उमलण्याची संधी मिळाली आहे. मुस्लिम बहुसंख्य काश्मीर खोऱ्यात भाजपाने ३ जागा जिंकल्या आहेत. या जागांपैकी श्रीनगरच्या खोंमोह -२ ही एक आहे, येथून भाजपाचे एजाज हुसेन विजयी झाले आहेत, बांदीपोरामध्ये एजाज अहमद खान विजयी झाले आहेत तर पुलवामा येथील काकपोरा येथून मिन्हा लतीफ विजयी आहेत.
रात्री उशिरापर्यंत निवडणूक आयोगाने २४१ जागांचे निकाल जाहीर केले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे