महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सोमवारी होणार सुनावणी, आज काय झालं?

नवी दिल्ली , ४ ऑगस्ट २०२२: महाराष्ट्रातील राजकीय संकटाबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा देत निवडणूक आयोगाला शिंदे गटाच्या अर्जावर अद्याप कोणताही निर्णय न घेण्यास सांगितले आहे.

CJI NV रमणा म्हणाले की, ८ ऑगस्ट रोजी सर्व पक्षांना निवडणूक आयोगात त्यांचे उत्तर दाखल करायचे आहे. पक्षाने उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितल्यास निवडणूक आयोग वेळ देण्याचा विचार करू शकते. या प्रकरणावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

एवढेच नाही तर हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सुनावणीसाठी पाठवायचे की नाही याचा निर्णय ८ ऑगस्टला घेणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.

अपात्रतेचा निर्णय आधी आला – सिंघवी

आमदारांच्या अपात्रतेसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी कपिल सिब्बल यांना विचारले की, हा राजकीय पक्षाच्या मान्यतेचा विषय आहे, आम्ही यात हस्तक्षेप कसा करायचा? ही बाब निवडणूक आयोगात आहे. यावर सिब्बल म्हणाले की, समजा आयोगाने या प्रकरणी निकाल दिला. यानंतर सर्वोच्च न्यायालय अपात्रतेबाबत निर्णय देते. मग काय होणार? सिंघवी म्हणाले की, अपात्रतेचा निर्णय आधी यायला हवा.

आम्ही एक स्वतंत्र घटनात्मक संस्था आहोत – निवडणूक आयोग

सिब्बल म्हणाले की, ३०/४० आमदार कोणताही राजकीय पक्ष करू शकतात आणि तोच खरा पक्ष असल्याचे सांगतात. दुसरीकडे निवडणूक आयोगाकडून असे सांगण्यात आले की, अशा प्रकरणांमध्ये कोणताही पक्ष आयोगाकडे आला, तर त्या वेळी खरा पक्ष कोण हे ठरवणे आयोगाचे कर्तव्य आहे? आम्ही स्वतंत्र घटनात्मक संस्था आहोत, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. आम्ही कागदपत्रे मागितली आहेत. ही प्रक्रिया पूर्णपणे वेगळी आहे.

हरीश साळवे म्हणाले, समजा सर्वांना अपात्र ठरवले आणि निवडणुका आल्या, तर आम्हीच खरे पक्ष आहोत असे म्हणता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या मताचे समर्थन करताना साळवे म्हणाले की, आमदार अपात्र झाले तरी राजकीय पक्षावर काय फरक पडणार आहे? CJI यांनी निवडणूक आयोगाला विचारले की, न्यायालय या प्रकरणी निकाल देईपर्यंत निवडणूक आयोग आपली कार्यवाही स्थगित करू शकतो का?

CJI म्हणाले, निवडणूक आयोगाने या प्रकरणी अजून निर्णय घेऊ नये. परंतु सर्व पक्ष प्रतिज्ञापत्र दाखल करू शकतात. याबाबत आम्ही आदेश जारी करत नाही. मात्र या प्रकरणी तूर्तास कोणतीही कारवाई करू नका.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा