मुंबई, २५ मार्च २०२१: राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आदी मोठ्या शहरांमध्येही रुग्णसंख्येच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून कठोर निर्बंध लादण्यात येत आहेत. असे असतानाही कोरोना रुग्णांची संख्या मात्र वाढतच आहे.
राज्यातील काल २०२१ मधील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. काल दिवसभरात ३१ हजार ८५५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात १५ हजार ९८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात ९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या २ लाख ४७ हजार २९९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील आतापर्यंतचा कोरोना रुग्णांचा आकडा २५ लाख ६४ हजार ८८१वर जाऊन पोहोचला आहे. त्यातील २२ लाख ६२ हजार ५९३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ५३ हजार ६८४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुण्यात काल दिवसभरात ३ हजार ५०९ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर १ हजार ४१० जण पूर्णपणे बरे झाले आहेत. पुण्यात दिवसभरात ३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यातील ९ रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. पुणयात सध्या २६ हजार ५१५ जणांवर उपचार सुरु आहेत. त्यातील ५९८ रुग्णांची स्थिती गंभीर असल्याचं प्रशासनाने सांगितले आहे.
मुंबईतील कालचा कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनक आहे. मुंबईत काल दिवसभरात ५ हजार १८५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २ हजार ८८ जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. मुंबईत दिवसभरातील मृतांची संख्या ६ आहे. त्यातील काहीजणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये ३ पुरुष आणि ३ महिला रुग्णांचा समावेश आहे. मुंबईतील रुग्णसंख्या दुपटीचा दर ८४ दिवसांवर आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे