रेल्वे अपघातातील १०१ मृतदेहांची ओळख अजुनही पटलेली नाही…

5

ओडिसा ६ जून २०२३ : शालीमार – चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस एका थांबलेल्या मालगाडीला धडकल्याने अपघात झाला, ज्यामुळे अनेक डबे शेजारच्या रुळावरून घसरले. त्यानंतर यशवंतपूरहून हावडाकडे जाणारी हावडा एक्स्प्रेस भरधाव वेगात बाधित डब्यांना धडकली, परिणामी ती रुळावरून घसरली.

बालासोरमध्ये दोन एक्स्प्रेस गाड्या आणि मालवाहतूक ट्रेनचा भीषण अपघात झाला ज्या मध्ये २७८ लोकांचा जीव गेला आणि ११०० हून अधिक लोक जखमी झाले. या दु:खद घटनेमुळे देशावर शोककळा पसरली आहे तर अनेक कुटुंब उध्वस्त झाले आहेत. अश्यातच आता आणखी काही गोष्टींचा सामना करावा लागत आहे.

ओडिशातील रेल्वे अपघातात २७८ लोकांचा मृत्यू झाला आणि ११०० हून अधिक लोक जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की अद्याप १०१ मृतदेहांची ओळख पटलेली नाही. माध्यमांशी बोलताना पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिंकेश रॉय यांनी अजूनही २०० लोक ओडिशातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असल्याचे सांगितले.

“अपघातात ११०० लोक जखमी झाले होते, त्यापैकी ९०० जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे तर २०० जणांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २७८ जणांपैकी १०१ जणांचे मृतदेह तसेच पडून आहेत.

भुवनेश्वर महानगरपालिकेचे आयुक्त विजय अमृत कुलंगे यांनी माध्यमांना सांगितले, “भुवनेश्वरमध्ये ठेवण्यात आलेल्या एकूण १९३ मृतदेहांपैकी ८० मृतदेहांची ओळख पटली आहे. ५५ मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. बीएमसीच्या हेल्पलाइन नंबरवर २०० हून अधिक कॉल आले आहेत. मृतदेहांची ओळख पटवून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अपघातस्थळी दिल्लीहून रवाना होण्यापूर्वी एका उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली होती. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालासोर मध्ये अपघातस्थळी जाऊन ग्राऊंड झिरोवरून आढावा घेत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींचीही भेट घेतली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा