सुकामेव्याच्या दरवाढीने ग्राहकांना भरतेय हुडहुडी!

घरोघरी पौष्टिक लाडू बनविण्यासाठी गृहिणींची लगबग

पुणे, २ डिसेंबर २०२२ : दिवाळी आटोपली आणि फराळाच्या लाडवांचे डबे रिकामे झाले, की अनेकांना वेध लागतात ते मेथी आणि डिंकाच्या लाडवांचे. थंडी वाढू लागली की आरोग्यवर्धकतेसाठी हे पौष्टिक लाडू करण्यासाठी घरोघरी महिलांची लगबग सुरू होते; मात्र यंदा भाजीपाला, खाद्यतेलांच्या दरवाढीचा सामना करणाऱ्या पुणे, पिंपरी-चिंचवडवासीयांना सुकामेव्याच्या दरवाढीचीही झळ सोसावी लागत असल्याने हे पौष्टिक लाडूही महाग पडणार आहेत. बाजारपेठेत सुकामेवा, डिंक आणि मेथीच्या मागणीत वाढ झाली आहे; परंतु जशी मागणी वाढू लागली तशी दरांतही वाढ होत आहे.

सुदृढ आरोग्यासाठी हिवाळा हा ऋतू महत्त्वाचा असतो. याकरिता थंडीच्या दिवसांत व्यायामासाठी मैदाने आणि जिममध्ये गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे या दिवसांत पौष्टिक पदार्थ खावेत, असा सल्लाही डॉक्टरांकडून दिला जात आहे. थंडीच्या दिवसांत साजूक तुपातील मेव्यांचे लाडू पहाटे किंवा सकाळी खाण्याची पद्धत आहे. त्यामुळे बाजारात अख्‍खा काजू, तुकडा काजू, बदाम, खारिक, खोबरे, गोडंबी, अक्रोड, पिस्ता याच्या खरेदीची लगबग शहरात दिसत आहे. शिवाय डिंक लाडू, खारीक-खोबऱ्याचे लाडू, मेथीचे लाडू घरी तयार करण्यासाठी साहित्य खरेदी केले जात आहे. मात्र, नोकरदारवर्गाकडे फारसा वेळ नसल्याने तयार लाडूंची मागणी वाढल्याचे विक्रेते सांगतात. त्यानुसार मिठाईच्या दुकानासह शहरातील किराणा आणि सुकामेवा दुकानात लाडूंची विक्री होत आहे. काही दुकानांमध्ये मेथीचे आणि डिंकाचे लाडू उपलब्ध आहेत. काही ठिकाणी फक्त सुकामेव्याचे लाडू विक्री होत आहेत. सुकामेव्याचेच भाव जास्त असल्याने तयार लाडूंचा दरही जास्त आहे. दर जास्त असला, तरी पौष्टिक लाडूची खरेदी जोरात असून, डिसेंबरअखेरीस मागणी अधिक वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तविली आहे.

सर्व ऋतूंत उत्तम ऋतू म्हणून हेमंत ऋतूकडे पाहिले जाते. सुदृढ शरीरासाठी जॉगिंग, व्यायामाबरोबरच नाश्त्यात स्निग्ध पदार्थयुक्त डिंक, मेथीचा लाडू, तर जेवणात उष्‍ण पदार्थांचा समावेश असतो. हेमंत ऋतूतील आहारात उडीद डाळीचे लाडू, उसापासून बनवलेले गोड पदार्थ (जसे की गूळ), नवीन तांदळाचा भात समाविष्ट केला जातो. पौष्टिक लाडूतील डिंक, गोडंबी, आळीव हे उष्‍ण व हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्‍त असतात. त्‍यामुळे कंबरदुखी, सांधेदुखी यापासून संरक्षण मिळते. बदाम, काजू, अक्रोड जीवनसत्त्वयुक्त पदार्थ, खसखस डोळ्यांसाठी पर्यायाने दृष्‍टीस उपयुक्‍त ठरते.

दरम्यान, घरोघरी बनविले जाणारे गव्हाच्या पीठाचे लाडू खायला खूपच चविष्ट लागतात. हे लाडू आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. कारण यामध्ये अनेक प्रकारचे ड्रायफ्रूट्स, मखाने, डिंक असते. या लाडूंमुळे हिवाळ्यात होणाऱ्या आरोग्याशी संबंधित त्रास दूर होतात.

सुकामेवा व किलोचे दर रुपयांमध्ये असे :
खोबरे- १८०, खारीक- २००, डिंक- साधा २४० आणि बाभळीचा ४००, मेथी- १६०, काजू- ८००, बदाम- ७२०, गोडंबी- ९६०, अक्रोड- ९६०, अंजीर- ७२०, खसखस- २ हजार, गूळ- ६०, जर्दाळू-४८०, पिस्ता- १ हजार १२०, किसमिस- २००, काळा मनुका- ४००, आळीव-४००.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा