मुंबई, २५ ऑक्टोंबर २०२०: कोरोना विषाणूच्या साथीमुळे आर्थिक हालचाल ठप्प झाली. याचा परिणाम बर्याच लोकांच्या उत्पन्नावर झाला. परंतु या काळात देशातील श्रीमंतांची संपत्ती वाढली. क्रेडिट सुईसच्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे. क्रेडिट सुईसच्या ग्लोबल वेल्थ अहवालानुसार ३० जून रोजी संपलेल्या सहामाही वर्षात भारताच्या दरडोई संपत्तीमध्ये सन २०१९ च्या तुलनेत ०.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
या अहवालात म्हटले आहे की, “कोरोना महामारी असूनही, सन २०१९ अखेर देशात प्रत्येक प्रौढ व्यक्तीची संपत्ती १७,३०० डॉलर्स होती, जी जून २०२० अखेर १७,४२० डॉलरवर पोचली.”
फायनान्स सर्व्हिसेस फर्म क्रेडिट सुइसच्या मते, २०२० च्या पहिल्या सहामाहीत सरासरी संपत्तीची वाढ १.७ टक्के होती. या फर्मच्या मते, सन २०२० मध्ये मालमत्तेची वाढ ५-६ टक्के आणि वर्ष २०२१ मध्ये ती ९ टक्क्यांपर्यंत जाऊ शकते.
या अहवालात असे म्हटले होते की भारतात लोकांच्या संपत्तीमध्ये मालमत्ता आणि रिअल इस्टेटचा सर्वाधिक वाटा होता. परंतु आता आर्थिक मालमत्तांकडेही कल वाढत आहे, ज्यांचा हिस्सा एकूण मालमत्तेच्या २२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
फायनान्स सर्व्हिसेस कंपनीने म्हटले आहे की, सन २०१९ मध्ये बिगर-आर्थिक मालमत्तेची वाढ १२.५ टक्के होती, तर वित्तीय मालमत्ता ८.६ टक्क्यांच्या दराने वाढली आहे. क्रेडिट सुईस म्हणाले की, भारतात आर्थिक असमानतेचे प्रमाण बरेच जास्त आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे