जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न मार्गी लावणार; मी भाजपचा नव्हे, महायुतीचा उमेदवार असल्याचा पुनरुच्चार : आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे

रत्नागिरी, ७ फेब्रुवारी २०२३ : शिक्षकांसहित राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेबाबत सभागृहात उपस्थित केला गेलेला प्रश्न चुकीचा होता. त्या प्रश्नाला अनुसरून उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी पेन्शन योजनेबाबत वक्तव्य केले होते; परंतु आपण त्यांना जुन्या पेन्शन योजनेबाबत सविस्तर माहिती देऊन ती कशी गरजेची आहे, हे पटवून दिले आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल, असा विश्वास कोकण शिक्षक मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. आपण भाजपचे नव्हे, तर युतीचे उमेदवार आहोत. युती हाच आपला पक्ष असल्याचे स्पष्टीकरण आमदार म्हात्रे यांनी दिले.

कोकण शिक्षक मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर आमदार म्हात्रे सोमवारी (ता. सहा) प्रथमच रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी शिक्षकांच्या सर्व संघटनांनी शासकीय विश्रामगृह येथे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर आमदार म्हात्रे पत्रकारांशी बोलत होते. गेली अनेक वर्षे शिक्षकांच्या प्रश्नांबाबत आपण संघर्ष करीत आहोत. शिक्षकांचे अनेक प्रश्न मी स्वतः सोडविले आहेत. स्वतः शिक्षक असल्यामुळे शिक्षकांचे प्रश्न काय आहेत, याची पूर्ण जाणीव मला आहे.
शिक्षकांचे प्रश्न नीट सोडवू शकतो, याची खात्री शिक्षकांना असल्यामुळे त्यांनी मला आपला प्रतिनिधी म्हणून विधानपरिषदेत पाठविले आहे. सहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांचा विश्वास सार्थकी लावू, असेही आमदार म्हात्रे यांनी सांगितले.

माझा विजय हा एकट्याचा नसून शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या सर्व संघटनांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे आपण आमदार म्हणून विजयी झालो. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री ना. उदय सामंत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्यासह कोकणातील सर्व आमदारांनी माझ्या पाठीशी सर्व यंत्रणा उभी केली. प्रत्येक मतदाराशी संवाद साधला. त्यामुळेच यशाचे शिखर गाठता आले. भाजप, बाळासाहेबांची शिवसेना यांच्यासह इतर घटक पक्ष, सर्व शिक्षक संघटना यांच्या युतीचा मी उमेदवार आहे. कोणत्याही एका पक्षाचा आहे, असे म्हणणे चुकीचे होईल. यापुढील सहा वर्षांत आपण जुन्या पेन्शन योजनेचा शिक्षकांचा प्रश्न शंभर टक्के मार्गी लावू, असा विश्वास आमदार म्हात्रे यांनी व्यक्त केला.

जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत वित्त मंत्रालयामार्फत अभ्यास सुरू आहे. योजना पुन्हा कार्यान्वित करताना सरकारच्या तिजोरीवर किती भार पडेल, ती कशाप्रकारे लागू करता येईल, याचा परिपूर्ण अभ्यास झाल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पेन्शन योजनेची घोषणा करतील, असा दावा श्री. म्हात्रे यांनी केला. रत्नागिरीत झालेल्या सत्काराच्या वेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघोदे, सचिव विनोद सांगावकर, कार्याध्यक्ष राजेश कांबळे, तालुकाध्यक्ष डी. डी. पोतदार, तालुका सचिव प्रशांत जाधव, राज्य सल्लागार मिलिंद कदम, ‘टीडीएफ’चे जिल्हाध्यक्ष सागर पाटील, मुख्याध्यापक संघाचे प्रतिनिधी, शिक्षक परिषदेचे रवींद्र इनामदार, राजेश आयरे; तसेच शिक्षक क्रांती व अन्य संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, पुढच्या महिना-दीड महिन्यात आपण शाळांना भेटी देणार असल्याचे व कामाचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी आपल्या धडाकेबाज भाषणातून सांगितले. चांगला धडाडीचा उमेदवार निवडून आणला आहे. आम्हा शिक्षकांना आता अन्यायाची भीती नसल्याची प्रतिक्रिया अनेक शिक्षकांनी बोलून दाखविली. उपस्थितांनी आपली निवेदने देऊन कामाचा पाठपुरावा करण्याचा आग्रह धरला.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : जमीर खलफे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा