एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटणार! महामंडळाला ५०० कोटी मंजूर

मुंबई, ३ सप्टेंबर २०२१: करोनामुळे लागलेले निर्बंध, त्यामुळे दुरावलेले प्रवासी, त्यातच इंधनाची दरवाढ इत्यादी कारणांमुळे एसटी महामंडळाला वर्षभरापासून आर्थिक चिंता सतावत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. मात्र आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. एसटी महामंडळाला ५०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशानंतर हा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.
एसटी मंडळाला मिळालेल्या तातडीच्या या निधीमुळे ९८ हजार एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाचा प्रश्न सुटणार आहे. कोरोना सुरू झाल्यापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मुद्दा नेहमीच चर्चेत राहिला आहे. या काळात एसटी महामंडळाला मोठे नुकसान सहन करावं लागलं. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत असून महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती काम करत आहे.
या समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार येणाऱ्या काळात कार्यवाही करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ५०० कोटी रुपये वितरित करण्याचे निर्देश दिले व त्यानुसर तातडीने निधी वितरित करण्यात आला. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
चालू आर्थिक वर्षासाठी १४५० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी ८३८ कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरित केला असून उर्वरीत ६१२ कोटींपैकी ५०० कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्यानंतर तातडीने हा निधी वितरित करण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा