जेजुरीत छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लवकरात लवकर उभारण्याची मागणी

पुरंदर, दि. २ जुलै २०२० : छत्रपती शिवाजीच्या महाराजांच्या स्वराज्याचा पाया पुरंदरच्या मातीत रोवला गेला, तसेच शहाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज या पितापुत्रांची भेट सुद्धा काही वर्षानंतर जेजुरी नगरीमध्ये झाली होती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जेजुरी नगरी असल्या कारणाने जेजुरीत पुणे-पंढरपूर महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा लवकरात लवकर उभारावा हि जेजुरीकरांची मागणी आहे.

पुरंदर तालुक्यातील सासवड मधील भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या धर्तीवर जेजुरीत सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारू अशा प्रकारचे आश्वासन देत जेजुरी नगरपरिषदेच्या गेल्या निवडणुकीत सत्ताधारी गट सत्तेत आला, मात्र सत्तेत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या बाबत मात्र कोणतीच ठोस भूमिका घेतल्याचे चित्र दिसून आले नाही. या बाबत जेजुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वीणा सोनावणे यांना याबाबत विचारणा केली असता, आम्ही जेजुरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारू अशा प्रकारचा शब्द दिला होता आणि आम्ही निवडणुकीच्या अगोदर शब्द पूर्ण करून शिवप्रेमींचा उर अभिमानाने भरून येईल असा महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारू अशी माहिती दिली.

तर जेजुरी नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई यांनी मात्र सत्ताधा-यांनी गेल्या ४ वर्षात महाराजांचा पुतळा का उभारला नाही ? असा सवाल करत जेजुरीत कुठे आडबाजूला नाही तर महामार्गावरच महाराजांचा पुतळा उभारावा अशी मागणी केली आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत यांनी राजकारण बाजूला ठेवून महाराजांचा पुतळा लवकरात लवकर उभारावा अन्यथा शिवप्रेमींच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा व्हावा अशी मागणी आता जेजुरीतील विरोधी पक्ष सुद्धा करत आहेत…मात्र अगोदर अनेक वर्ष सत्तेत असताना त्यांनी सुद्धा याबाबत का पुढाकार घेतला नाही हे सुद्धा कोडेच आहे. जेजुरीत विविध सामाजिक संघटना, शिवप्रेमींची वाढलेली ताकद पाहता येणाऱ्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळ्याबाबत राजकारण झालं तर येणाऱ्या निवडणुकीत जेजुरीतील शिवप्रेमी आणि सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधक यांच्याशिवाय वेगळं चित्र निर्माण झालं तर नवल वाटायला नको.

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा जेजुरीत सत्ताधारी, विरोधक, सामाजिक कार्यकर्ते सगळ्यांनीच एकत्र येऊन मतभेद विसरून एकदिलाने लवकरात लवकर उभारावा हीच अपेक्षा सामान्य जेजुरीकर नागरीक व्यक्त करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा