सुप्रीम कोर्टात आज लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणी होणार सुनावणी

नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर 2021: लखीमपूर खेरी इथं 3 ऑक्टोबरला झालेल्या हिंसाचाराशी संबंधित प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे.  या घटनेत चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता.  मुख्य न्यायमूर्ती एनव्ही रमणा, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होईल ज्यात न्यायालयानं 26 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेश सरकारला लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील साक्षीदारांना संरक्षण देण्याचे निर्देश दिले होते.
 न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारला फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम 164 अंतर्गत खटल्यातील इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचे निर्देश दिले होते आणि डिजिटल पुरावे लवकरात लवकर तज्ञांकडून तपासण्यास सांगितले होते.  सुप्रीम कोर्टानं पत्रकार आणि श्याम सुंदर नावाच्या व्यक्तीला जमावानं मारल्याच्या प्रकरणी स्टेटस रिपोर्ट दाखल करण्याचे निर्देश दिले होते.
दोन वकिलांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहून लखीमपूर खेरी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती.  या पार्श्वभूमीवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.  26 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितलं होतं की, “68 साक्षीदारांपैकी 30 साक्षीदारांचे जबाब सीआरपीसीच्या कलम 164 अंतर्गत नोंदवले गेले आहेत आणि इतर काहींचे जबाबही नोंदवले जातील.”  या 30 साक्षीदारांपैकी 23 जणांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचा दावा केलाय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा