नागपूर, ११ सप्टेंबर २०२०: मागील सात महिने तुकाराम मुंढे हे नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहत होते. या काळात त्यांच्या अनेक निर्णयांना राजकीय पक्षांचा विरोध झाला. मात्र, नागरिक त्यांच्या बाजूने उभे राहिले. कडक शिस्तीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे सदस्य सचिव म्हणून बदली करण्यात आली होती. मात्र राज्य सरकारने अवघ्या १५ दिवसात हे आदेश मागे घेतले. आता त्यांची नियुक्ती नेमकी कुठे केली जाणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. जनतेने मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे. नागपूर महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीविरोधात सर्वसामान्य जनता आक्रमक होणं नवीन नाही. मुंडे मुंबईला रवाना होण्यापूर्वी नागपुरातही हेच चित्र पाहायला मिळालं. तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ सरकारी निवासस्थानासमोर लोकांनी मोठी गर्दी केली.
‘नागपुरात सात महिने राहिल्यानंतर मी आपला निरोप घेत आहे. या सात महिन्यात या शहराला उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला. या काळात काही प्रकल्प पूर्ण झाले. काही सुरू आहेत. काही अजून सुरू झालेले नाहीत. हे सगळं होत असतानाच माझी बदली झाली. आता, ‘मै चल पडा मेरे राह की ओर…. या नियमानुसार पुढील कामकाजासाठी आपल्या सर्वांचा निरोप घेत आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
“नागपूरकरांनी मला दिलेलं प्रेम माझ्या अंतःकरणात आहे. नागपूरचं प्रेम अविस्मरणीय आहे,” असं तुकाराम मुंढे म्हणाले. “सगळ्यांच्या सहभागातून चांगलं काम होऊ शकतं. तुम्ही असेच प्रेम करत राहा, मी माझं काम करत राहीन. मी जेवढं करु शकलो ते १०० टक्के केलं. शहर तुमचं आहे, आपल्या शहराच्या विकासासाठी एक राहा, शहराचा विकास करा,” असा सल्ला तुकाराम मुंढे यांनी दिला नागपूरकरांना दिला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे