इंदापूर , दि. १६ मे २०२० : पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या कारणास्तव काही ठिकाणी नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. परंतू इंदापूर शहरासह तालुक्यात एकही कोरोना रुग्ण न सापडल्याने इंदापूर नागरपरिषदेने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दिवसाआड वेळ आणि वार ठरवून व्यापारी बाजारपेठ सुरू करण्याची मागणी केली होती.
त्या अनुषंगाने त्याला परवानगी मिळाल्याने इंदापूर नगरपरिषदेने व्यापारी बाजारपेठ सुरू केली. मात्र बाजारपेठ सुरू होताच सर्व नियम अटींची अंमलबजावणी न करता ते पायदळी तुडवीत नागरिकांनी कमालीची गर्दी केली होती.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि सोशल डिस्टनसिंगचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी इंदापूर नगरपरिषदेने शनिवारपासूनच बाजारपेठेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून वाहनांना बंदी घातली आहे. नगरपरिषदेने ग्राहकांच्या वाहनांची सुविधा शंभर फुटी रोड ,नगरपरिषद किंवा एसटी स्टँड या ठिकाणी केली असल्याची माहिती मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी दिली.
मुख्य बाजारपेठेत वाहनांना जाण्यास मज्जाव केल्याने त्या ठिकाणी कोणतीही गर्दी होणार नाही. तसेच बाजारपेठेच्या प्रवेशद्वाराजवळ एक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी बाहेर पडताना पायी येण्याचे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यावेळी म्हणाल्या की, इंदापूर नगरपरिषदेने कोरोनाला शहरापासून अद्याप तरी दूर ठेवले आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये आणि प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे