अहमदनगर, ७ जुलै २०२० : राज्यातील सुमारे दीड कोटीच्या आसपास असलेल्या वीरशैव लिंगायत समाजातील ’जंगम’ या जातीचा अनुसूचित जाती मध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी शिवा संघटनेचे नगर जिल्हा अध्यक्ष तथा वीरशैव लिंगायत समाजाचे युवा नेते नितीन शेटे (जंगमस्वामी) यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा ना उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
वीरशैव लिंगायत समाजातील लिं. वाणी या जातिसह अनेक जाती उपजातीना आरक्षण मिळवण्यासाठी शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रा मनोहर धोंडे सर यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत अनेक प्रकारे तीव्र आंदोलने, विराट मोर्चे, भव्य रास्ता रोको आंदोलन, लिंगायत आरक्षण हक्क परिषदा, उपोषणे, आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन अशा रीतीने लोकशाहीच्या मार्गाने जात वीरशैव लिंगायत समाजातील लीं. वाणी या जातीला ओबीसी तर अनेक जाती उपजातीला त्या त्या प्रवर्गातील आरक्षण मिळवून दिले.
परंतु आरक्षणाची ही लढाई इथे थांबली नसून वीरशैव लिंगायत समाजातील लाखोंच्या संख्येने असलेल्या ’जंगम’ या जातीचा समावेश अनुसूचित जाती मध्ये समावेश व्हावा यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
’जंगम’ ही जात प्रामुख्याने अनुसूचित जाती मध्ये मोडते महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जातीच्या यादीमध्ये अनु क्र.९ वर बेडा जंगम, बुडगा जंगम तर अनु क्र.४२वर माला जंगम या जातीचा पूर्वीपासूनच समावेश आहे या सर्व जाती ’जंगम’ या एकाच जातीच्या प्रवर्गातील जाती असून यांचे रोटी बेटी व्यवहार एकच असताना ’जंगम’ या जातीचा समावेश महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) यादी मध्ये अनु क्र.५८ वर चुकुन किंवा जाणीव पूर्वक अथवा अत्यंत खोडसाळ पण समावेश करण्यात आला आहे.
याबाबत राज्य शासनाने राज्य मागासवर्ग आयोग पुणे यांचे कडून चौकशी अहवाल प्राप्त करून घ्यावा व जंगम समाजाला न्याय द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे, सध्या जगभरात व राज्यात कोरोना या संसर्गजन्य रोगांच्या प्रादुर्भवामुळे राज्य शासनाने सर्वत्र जिल्हा बंदीचे आदेश दिले आहेत परंतु ही परिस्थिती पूर्व पदावर येताच शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रा मनोहर धोंडे सर यांचे नेतृत्वाखाली शिष्टमंडळ घेऊन राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना या बाबत समक्ष भेटणार आहोत असे ही नितीन शेटे यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी:प्रदीप पाटील