‘पठाण’ चित्रपटाला घवघवीत यश; विक्रमांची गणती सुरूच

मुंबई, १६ फेब्रुवारी २०२३ : ता. २५ जानेवारी रोजी ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट आजही अनेक विक्रम तोडत चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर २१ दिवसांमध्येच ‘पठाण’ने ४९८.८५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवून ‘पठाण’ हा चित्रपट ५०० कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे. विशेष म्हणजे ५०० कोटींचा टप्पा पार करणारा ‘पठाण’ हा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट आहे. याआधी ‘बाहुबली २’ने हा विक्रम केला होता.

चित्रपट प्रदर्शित झाला त्या दिवशीच चित्रपटाने भारतात ५७ कोटी रुपये कमविले. तर दुसऱ्या दिवशी ७०.५० कोटी कमविले. दिवसेंदिवस चित्रपटाला मिळणाऱ्या यशाने चित्रपट ५०० कोटींच्या घरांमध्ये जाऊन पोचला आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील इतर विक्रमांप्रमाणेच देशभरात सर्वांत जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘पठाण’ या चित्रपटाचा समावेश झाला आहे. शाहरुखने तब्बल चार वर्षांनंतर चित्रपटात पदार्पण केल्याने सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट पहिल्या दिवशीपासूनच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत होता.

शाहरुखने अनेकदा सांगितल्याप्रमाणे, त्याला नेहमीच ॲक्शन हिरोचे काम करायचे होते; परंतु तो प्रेक्षकांसमोर आला तो एक रोमँटिक हिरो बनून. त्याने अभिनयाच्या जोरावर एक रोमँटिक हिरो म्हणून नाव कमविलेच; पण या चित्रपटाच्या यशानंतर शाहरुख एक ॲक्शन हिरो म्हणून देखील यशस्वी ठरताना दिसत आहे. तर या चित्रपटातून शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आल्याने या जोडीला देखील प्रचंड प्रेम मिळाले आहे.

बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान फक्त ‘पठाण’ हा एकच चित्रपट नाही, तर ‘डंकी’ आणि ‘जवान’ या दोन चित्रपटांसह पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ या चित्रपटातून तापसी पन्नू सोबत शाहरुखची मुख्य भूमिका असून तो चित्रपट २२ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ‘जवान’ हा चित्रपट २ जून २०२३ रोजी हिंदीसोबतच इतर भाषांमध्येही प्रदर्शित होणार असल्याचे सोशल मीडियावरून समजले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा