राजगुरूनगर , २९ जुलै २०२० :भामा-आसखेड परिसरातील थोपटवाडी ( ता.खेड ) येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला विवस्त्र करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा अखेर तपास लागला असून नात्यातील अल्पवयीन मुलाने हत्या केल्याची कबुली दिली.
चाकण पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रकाश धस यांनी दिली आहे.
अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या केल्याने खेड तालुक्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली होती. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या प्रवृत्तीला ठेचून काढण्याची गरज असल्याचे सांगत घटनास्थळाची पाहणी दरेकरांनी केली होती. तसेच त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती.
चाकण पोलिसांनी मंगळवारी अखेर या प्रकरणाच्या खोलवर तपास करत त्या विधिसंघर्षग्रस्त मुलाला अटक केली आहे . याबाबत चाकण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, अल्पवयीन मुलाने वरील अल्पवयीन मुलगी आपल्याला वारंवार हिजड्या सारखा काय वागतोस,हिजड्या सारखा काय हसतो असे बोलून हिणवत होती त्या गोष्टीची चीड व संताप होता. तसेच अल्पवयीन मयत मुलगी इतरांशी चांगले बोलते व आपल्याशी नीट बोलत नाही याचा राग मनात होता. त्यामुळे त्याने तिला मारण्याचे ठरविले, त्याला क्राइम पेट्रोल सावधान इंडिया ,अश्लील व्हिडिओ पाहण्याची सवय आहे. त्यामुळे त्याने स्वतः मनात आखणी करून तिला मारण्याचे ठरविले घटनेच्या दिवशी मयत मुलगी ही किराणा दुकानात गेली हे त्याला माहीत होते व तिला परत येण्यास वेळ लागणार याची त्याला जाणीव होती.
मयत मुलीच्या घरातून दुकानाकडे जाण्याच्या रस्त्यावर अल्पवयीन मुलाचे घर आहे. ती दुकानात जाताना व परत येते वेळी दरम्यानच्या काळात तो तिच्याशी वारंवार फोनवर बोलत होता. आणि ती सध्या कुठे पोहोचली याची माहिती घेत होता .ती दुकानाकडे गेल्यानंतर तिला परत येण्यास लागणाऱ्या वेळेचा विचार करून तिचे घरी परत जाण्याच्या मार्गावर ओढ्यातील निर्जनस्थळी मनात आखणी केलेल्या ठिकाणी मार्गावर एक मोठा दगड आणून ठेवला तसेच सागाच्या झाडाची फांदी आणून ठेवली आणि तो परत घरी येऊन तिची वाट पाहत थांबला. त्यानंतर थोड्याच वेळात मयत मुलगी घाई मध्ये तिची मोठी बहीण घरी येणार असल्याने व तिला जेवण तयार करायचे असल्याने दुकानातील वस्तू घेऊन गडबडीने घरी निघाली होती.ती मटकी घेण्यासाठी त्याच्या घरी आले असता तिला त्याने मटकी डबा घराबाहेर दिला. मयत मुलगीही तिच्या घरी पिशवी व मटकीचा डबा घेऊन निघाली असता पाठीमागून लगेच अल्पवयीन मुलगा धावत दुसऱ्या मार्गाने जाऊन नियोजित ठिकाणी ती येण्याच्या पूर्वी पोहोचला आणि झाडाची फांदी घेऊन लपून बसला. ती जवळ येताच अचानक तिच्या वर हल्ला करून तिला खाली पालथे पाडून तिच्या तोंडात कापडी बोळा घालून डोक्यात मोठा दगड घालून तिला गंभीर दुखापत करून ठार मारले. यानंतर मयत मुलीस खांद्यावर उचलून घेऊन कॅननचे दरडी लगत घेऊन गेला व त्या ठिकाणी मृतदेहावरील कपडे काढून विवस्त्र मृतदेह लिंबाच्या झाडाखाली टंटनीचा झुडपात कोणाच्या निदर्शनास येणार नाही अशा ठिकाणी लपवून ठेवला. त्यानंतर मयताचे शरीरावरील काढलेले कपडे ,मोबाईल फोन, दुकानातून वस्तू आणलेल्या पिशवीत भरले व पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने इतर ठिकाणी लपून ठेवले आणि घरी येऊन स्वतःचे अंगावरील कपडे बदलून ते लपवून ठेवून आंघोळ करून घरी थांबला त्यानंतर सदर मुलगी घरी न पोहचल्याने शोध मोहीम सुरू झाल्यानंतर शोध मोहिमेत स्वतः सहभागी झाला.
मुलीचा मृतदेह मयताचे चुलत मामाचे निदर्शनास आल्यानंतर ती मयत झाली आहे याबाबत घटनास्थळावर जाऊन खात्री न करताच मुलीच्या घरी जाऊन तिचे बहीण व भाऊ यांना सदर मुलगी ही या जगात राहिले नाही असे सांगितले. सदर अल्पवयीन मुलगा वय वर्षे १७ वर्ष विधिसंघर्षग्रस्त बालक याने क्राइम पेट्रोल सावधान इंडिया कंचना १, कंचना २ हे दाक्षिणात्य सिनेमे तसेच इतर मालिका पाहून पुरावा नष्ट करणे इत्यादी बाबी ची कल्पना अमंलात आणून हा खून केल्याचे चौकशीत सांगितले तसेच त्याने सांगितल्याप्रमाणे चाकण पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन मुलीचे शरीरावरील कपडे तसेच ती घेऊन जात असलेल्या वस्तू हस्तगत केल्या असून अल्पवयीन मुलास पीठासीन अधिकारी बाल न्याय मंडळ येरवडा पुणे, यांच्या समक्ष हजर करण्यात आले आहे.
फिर्यादी यांनी नमूद केलेले वरील तीन संशयित आरोपी यांचा नमूद गुन्ह्यात सहभाग नसल्याने तसा अहवाल न्यायालयात पाठवला आहे .
सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिश्नोई ,अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे ,पोलिस उपायुक्त स्मिता पाटील, सहायक पोलिस आयुक्त राम जाधव यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे ,पोलीस उपनिरीक्षक भाऊ डुबे ,पोलीस हवालदार सुरेश हिंगे ,विठ्ठल कुंभार ,राजू जाधव, पोलीस नाईक संजय जरे, अनिल गोरड, बापू सोनवणे, हनुमंत कांबळे, वीरसेन गायकवाड ,पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप काळे, मनोज साबळे, नितीन गुंजाळ, निखिल वरपे अशोक दिवटे, मच्छिंद्र भांबुरे, उद्धव गरजे ,यांनी केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊ डूबे हे करीत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : सुनिल थिगळे.