मुंबई, दि. १८ जून २०२० : प्रत्यक्ष सीमारेषेवर भारत आणि चीन यांच्यामध्ये झालेल्या चकमकीमध्ये २० जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर पूर्ण देशांमधून निषेध नोंदविला जात आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे पुतळे जाळले जात आहेत तर काही ठिकाणी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून चीन विरोधी आपला संताप व्यक्त केला जात आहे. पण आता मुंबईमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वेगळ्या पद्धतीने आपला निषेध नोंदविला आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिनी खुळखुळे देऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला आहे. चीनने केलेल्या हल्ल्यामध्ये भारतीय सैन्यामधील २० जवान शहीद झाले तरीदेखील सरकारकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही याविषयी संताप व्यक्त करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अशाप्रकारे आपला निषेध दर्शवला आहे.
चीन सातत्याने आपल्यावर हल्ला करत आहे परंतु केंद्र सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही आता या हल्ल्यामध्ये आपले वीर जवान देखील शहीद झाले आहेत. नरेंद्र मोदी नेहमीच कोणत्याही विषयावर ट्विट करत असतात परंतु प्रत्यक्षात चीनने केलेल्या हल्ल्याबद्दल त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया आपल्या ट्विटर अकाउंट वर दिले नाही. याबाबत राष्ट्रपती युवक काँग्रेसने आपली तीव्र नाराजी दर्शवली आहे.
याशिवाय नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात कोणतीही ठोस पावले उचललेली दिसत नाहीत. त्यामुळे आता चीनला ‘लाल डोळे’ दाखवायची वेळ आली आहे. तुम्ही त्यांना ‘लाल डोळे’ दाखवा पूर्ण देश तुमच्या सोबत आहे, असं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी