नीरा बाजारपेठ राहणार तीन दिवस बंद

5

पुरंदर, दि. ९ जुलै २०२०: पुरंदर तालुक्यातील सर्वच मोठ्या गावातून आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. नीरा शहरात अजून तरी कोरोना रुग्ण आढळून आला नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून निरा ग्रामपंचायतीने तीन दिवस जनता कर्फू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस नीरा बाजारपेठ बंद असणार आहे.

पुरंदर तालुक्यातील नीरा शहर हे सातारा व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असणारे गाव आहे. या गावात आज अखेर कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. मात्र या गावाच्या जवळ असलेल्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील गावांमधून कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. येथील लोकांचा पुरंदर मधील नीरा शहरात नेहमीचा राबता असतो. या गावातील अनेक लोक बाजारपेठेत खरेदी-विक्रीसाठी येत असतात. नीरा बाजार पेठेमध्ये किराणा व शेतमाल खरेदीसाठी किंवा विक्रीसाठी शेजारच्या गावातील लोक येत असतात.

नीरेच्या आजूबाजूच्या गावांमधून कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यातील वाल्हा, जेजुरी दौड्ज, पिंगोरी या गावातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या गावातील दुकाने काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र या गावातील लोक नीरा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वावरतांना दिसत आहेत. त्या गावातील दुकाने बंद असल्यामुळे किराणा व इतर खरेदीसाठी हे लोक नीरा येथे येताना दिसत आहेत. त्यामुळे नीरा शहरा मध्येही कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असल्याने आज नीरा ग्रामपंचायतीच्यावतीने तीन दिवस म्हणजेच उद्या शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवशी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा माहिती ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण आणि दीपक काकडे यांनी दिली आहे.

यावेळी चव्हाण यांनी लोकांनी या जनता कर्फ्यू मध्ये सहभागी व्हावे कोणीही ही दुकाने उघडून नयेत किंवा गावाबाहेर पडू नये. बाहेरील गावच्या लोकांनी निरेत येऊ नये. शेजारच्या गावांमधून कोरोनाचा धोका वाढला असताना आपणही काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

नीरा मध्ये काल ग्रामपंचायत कार्यालयात दक्षता कमिटीच्या मिटिंगमध्ये नीरा बाजारपेठ बंद न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आज नीरा बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे नीरा बाजारपेठ पुढील तीन दिवस बंद ठेवणे गरजेचे होऊन बसले असे ग्रामपंचायत सदस्य दीपक काकडे म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा