किल्ले धारुर येथे मुंबई, पुण्याहुन येणाऱ्यांची संख्या वाढली

बीड, दि.१९ मे २०२०: बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर परिसरात मुंबई, पुणे व औरंगाबादसह इतर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात येणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

याबाबत आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, किल्ले धारुर तालुक्यातील ग्रामीण भागात दि.१ ते १८ मे पर्यंत १५५० व्यक्ती पर जिल्ह्यातून आल्या आहेत. या सर्व व्यक्तींना आरोग्य विभागाने तपासण्या करुन होम क्वारंटाइन केले आहे. या व्यक्तींनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन शेकडे यांनी केले आहे.

मुंबई, पुणे, औरंगाबादसह इतर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींचा लोंढा वाढला आहे. जिल्ह्यातील गेवराई, माजलगांव व आष्टी तालुक्यात याच लोकांमधील अकरा व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याचे आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीतून स्पष्ट झाले आहे. किल्ले धारुर तालुक्यातही पर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींची संख्या मोठी आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार दि.१ मे ते १८ मे पर्यंत किल्ले धारुर तालुक्यातील ग्रामीण भागात तब्बल १५५० व्यक्ती दाखल झाल्या आहेत. या सर्वांची आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी करून त्यांना होम क्वारंटाइन केले आहे. त्यांच्या घरावर होम क्वारंटाइनचे स्टिकर लावण्याचे काम सुरू आहे. या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली नसली तरी पुढील काळात त्यांच्यापासून कोरोनाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यांमध्ये आशा कार्यकर्ती व ग्राम दक्षता समिती मार्फत सर्वेचे काम सुरू आहे.

या सर्व व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी गावा-गावांत ग्राम दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्याचबरोबर आरोग्य विभागही या क्वारंटाइन व्यक्तींवर बारीक लक्ष ठेऊन असल्याचे सांगत या सर्व क्वारंटाइन व्यक्तींनी बाहेर न निघता सामाजिक आंतर ठेऊन स्वतः ची काळजी घ्यावी असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन शेकडे यांनी केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा