नवी दिल्ली, ६ जुलै २०२३ : गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भारतातील अतिश्रीमंतांची संख्या वाढलेली दिसतेय. एवढेच नाही तर या बाबतीत ग्रामीण भागाने शहरांना मागे टाकलंय. येत्या १० वर्षांत ‘सुपर रिच’ म्हणजेच अति श्रीमंत कुटुंबांची संख्या ५ पटीने वाढणार आहे. आणि यात ग्रामीण भारत अग्रेसर असेल असा अंदाज आहे. पीपल्स रिसर्च ऑन इंडियाज कंझ्युमर इकोनॉमी सिटीझन एनव्हायरमेंट (प्राइस) ने काल एक अहवाल जाहीर केलाय. त्यानुसार, वार्षिक दोन कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या अतिश्रीमंत लोकांच्या कुंटुंबाची संख्या २०२१ पर्यंत, दुपटीने वाढून १८ लाख झालीय. ग्रामीण भागात या अतिश्रीमंत कुटुंबांची वाढ १४.२% तर शहरांमध्ये ती वाढ १०.६% इतकी होती.
माहितीनुसार, एका संस्थेने देशभरातील वेगवेगळ्या राज्यांत तीस ते चाळीस हजार पेक्षा अधिक लोकांचे सर्वेक्षण केले. ग्रामीण भागाचा विकास वेगाने होत असल्याने, तिथे पुढील दहा वर्षात अतिश्रीमंत कुटुंबांची संख्या चार ते पाच पटीने वाढेल असा अंदाज व्यक्त होतोय.
सध्या ग्रामीण भागात उद्योगधंदे भरभराट करतायत. त्यामुळे नोकऱ्या आणि छोटे व्यवसाय निर्माण होतायत. आता खेड्यापाड्यातील लोक हे कृषी व्यवसायासह बिगर-कृषी कामेही करत आहेत. यामुळेच या भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळून श्रीमंतीही वाढत आहे.
देशात कोट्यधीशांची संख्या वाढत असताना, सर्वेक्षणानुसार सव्वा लाख रुपयांपेक्षाही कमी कमाई असलेल्या वर्गातील लोकांची संख्याही येत्या काळात कमी होऊन त्यांचेही उत्पन्न वाढणार आहे. यात मध्यमवर्गीयांची संख्या जास्त असणार आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे