मायेची फुंकर घालणारी परिचारिका…

पुणे दि. १२ मे २०२० : रुग्णांवर मायेची फुंकर घालून त्यांची अहोरात्र सेवा करणाऱ्या विशेषतः खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमधील परिचारिकांचे जीवन कष्टमय, दुःखप्रद असेच आहे. किमान वेतन कायदा लागू होऊन देखील खाजगी रुग्णालयांमध्ये अद्यापही तुटपुंज्या पगारात परिचारिका काम करत असल्याचे चित्र दिसत आहे. येथे कायद्याचे संरक्षण नाही, नोंदणीकृत अहर्ता नसल्याने त्यांना इतरांप्रमाणे मानसन्मान मिळत नाही. कामाच्या ठिकाणी डॉक्टर, कंपाउंडर कधीकधी रुग्णांकडून देखील त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रासांना सामोरं जावं लागते. एकूणच रुग्ण सेवेला सुखापेक्षा दुःखाचीच झालर अधिक असल्याचे चित्र समोर दिसतं.

आधुनिक परिचारिकेच्या जनक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा १२ मे हा जन्मदिवस. त्यांचा जन्मदिवस हा वैद्यकीय क्षेत्रामध्ये परिचारिका दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. परंतू आजही खाजगी क्षेत्रातील परिचारिका आणि सरकारी क्षेत्रातील परिचारिका यांच्या समस्यांचे निराकरण झालेलं दिसत नाही. बाळाचा जन्म झाल्यावर सुरक्षित तळहातावर उचलून घेणारी ही परिचारिका असते. आईच्या ही आधी बाळाला सर्वप्रथम न्हाऊ घालन, स्वच्छ करणे ही सगळी सेवा परिचारिकाच करत असते. नंतर जन्मभर रुग्णांना हीच परिचारिका अखंड सेवा देत असते. यातना आणि वेदनांनी तळमळणार्‍या रुग्णांची सुश्रुषा करणारी आणि धीर देणारी ती जणू देवदूतच असते. मात्र त्यांच्या समस्यांकडे विशेषतः काही खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल जात असल्याचे चित्र आहे.

बदलत्या काळानुसार खाजगी रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या परिचारिकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. परंतु यातील काही परिचारिका किमान वेतन कायदा लागू होऊन देखील तुटपुंज्या पगारावर काम करतात. कायद्याचं संरक्षण नसल्यामुळे अपमानाचा डोंगरच घेऊन जणू त्या जगत असतात. ग्रामीण भागात त्यांच्यावर लसीकरण, प्रसूती, कुटुंबकल्याण यांसारख्या कामांचा बोजा टाकला जातो. तरीही एखाद्या देवदूताप्रमाणे परिचारिका आपली भूमिका बजावत असतात. स्वतःचे दुःख विसरुन रुग्णांच्या जखमांवर मायेची फुंकर घालत असतात.

– ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा