विस्थापितांची दर्दभरी कहाणी, सरकार आणि विरोधकांमध्ये जुंपली!

45

विश्वजीत राळे, प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याच्या पूर्वसंध्येला अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या भारतीयांना ट्रम्प सरकारनं घरचा रस्ता दाखवला आणि त्याचे पडसाद देशभर उमटले. १०४ भारतीयांना अमेरिकेतून घेऊन निघालेले विमान दोन दिवसांपूर्वी भारतातील अमृतसर विमानतळावर उतरले. मात्र या प्रवासादरम्यान निर्वासितांचा छळ झाल्याचं परत आलेल्या नागरिकांचं म्हणणं आहे. संसदेत या घटनेचे तीव्र पडसाददेखील उमटले आहेत. याविषयी विरोधी पक्षानं सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. तर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलंय.

अमेरिकेतून भारतात पाठवल्या गेलेल्या या निर्वासितांचे धक्कादायक अनुभव आता समोर येत आहेत. निर्वासितांची यात मोठी आर्थिक फसवणूक तर झालीच, परंतु त्यासोबतच त्यांना प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रासालादेखील सामोरं जावं लागलं असल्याचं त्यांनी सांगितलंय. या निर्वासितांनी आपले अनुभव कथन केले आहेत.

अमेरिकेतील विस्थापित भारतीय नागरिक

अमेरिकेहून भारतात परतलेल्या हरविंदर सिंग यांनी या प्रवासातील आपले धक्कादायक अनुभव सांगितले.


काय म्हणाले हरविंदर सिंग?
हरविंदर सिंग हे पंजाबमधील ताहली गावचे रहिवासी. अमेरिकेतून भारतात पाठवण्यात आलेल्या निर्वासितांच्या पहिल्या तुकडीत ते होते. हा प्रवास नरकाहूनही भयंकर असल्याचं त्यांनी सांगितलंय. हरविंदर सिंग म्हणतात, “आमच्या हाता-पायांत जबरदस्तीनं बेड्या घालण्यात आल्या. बेड्या काढण्याची वारंवार मागणी करुनही आमच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. तशाच अवस्थेत आम्हाला जेवण करण्यास भाग पाडलं गेलं.”


यांतीलच एक असलेल्या जयपाल सिंग यांची कहाणी अंगावर शहारे आणणारी आहे.

जयपाल सिंग यांची थरारक कहाणी

२४ जानेवारीला जयपाल सिंग यांनी ‘डंकी रुट’द्वारे अमेरिकेत प्रवेश केला. एका ट्रॅव्हेल एजंटच्या मदतीनं ते अमेरिकेत पोहोचले खरे, मात्र त्यांना त्याच दिवशी अटक करण्यात आली. त्यांचा हा प्रवास निश्चितच खडतर होता. ‘डंकी रुट’ने जात असताना तब्बल ४५ किलोमीटरची त्यांना पायपीट करावी लागली. त्यासाठी तब्बल १५ तास ते चालत होते. त्यांना सर्वप्रथम इटली आणि मग तेथून पुढे दक्षिण आफ्रिकेत नेण्यात आले. “समुद्रात बोटीतून जात असताना बोटीला अपघात झाला आणि त्यात एका साथीदाराचा बुडून मृत्यू झाला. त्यात मी सुदैवानं वाचलो”, असं ते सांगतात. ते पुढे म्हणतात, “पनामाच्या जंगलातदेखील एका साथीदाराचा मृत्यू झाला. प्रवासात कित्येक डोंगर आडवे आले, वाटेत कित्येक मृतदेह नजरेस पडत होते, मात्र या साऱ्या अडचणींवर मात करत आमचा प्रवास चालूच होता.


विरोधकांची सरकारवर टीका

विरोधकांकडून सरकारवर हल्लाबोल

याप्रकरणी विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय.
भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी सरकारनं काहीच प्रयत्न का केले नाहीत?
भारतीय नागरिकांना इतक्या हालअपेष्टा सहन करण्यास का भाग पाडलं?
अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदी हा मुद्दा उचलणार का?
आणखी किती नागरिकांना भारतात पुन्हा पाठवलं जाणार आहे?
यांसारखे विविध प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले आहेत.

विरोधकांच्या टीकेवर सरकारचं स्पष्टीकरण

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

विरोधकांच्या टीकेवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी उत्तर दिलंय. प्रवासादरम्यान स्थलांतरितांना अन्न आणि इतर आवश्यक गोष्टी दिल्या गेल्या. वैद्यकीय तसेच आपल्कालीन सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या असल्याचं जयशंकर यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, “स्थलांतरितांना विमानानं परत पाठवण्याची पद्धत नवी नसून यापूर्वीदेखील स्थलांतरितांना परत पाठवण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.”
“भारतात पाठवण्यात येणाऱ्या नागरिकांसोबत कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन घडू नये, त्यांना सुरक्षित मायदेशी परत आणलं जावं, यासाठी अमेरिकन सरकारशी चर्चा सुरू आहे”, असंदेखील ते म्हणाले.

एक प्रतिक्रिया

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा