मसूद अजहर च्या भावानं रचला होता नगरोटा हल्ल्याचा कट

श्रीनगर, २२ नोव्हेंबर २०२०: लष्कराच्या शौर्यामुळं नगरोटा येथे होणारा मोठा घातपात टळला. यानंतर देशभरातून सैन्याचं कौतुक करण्यात येत आहे, यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील सैन्यदलाचं कौतुक केलं आहे. जैश-ए-मोहम्मद अतिरेकी अब्दुल रऊफ असगर हा नगरोटा चकमकीत सुरक्षा दलांनी ठार झालेल्या चार दहशतवाद्यांचा म्होरक्या असल्याचं समोर आलं आहे. तो मुंबई हल्ल्याचा कुख्यात दहशतवादी आणि मास्टरमाईंड मसूद अझरचा भाऊ आहे. विशेष म्हणजे यामध्ये हे दहशतवादी पाकिस्तानचेच असल्याचा आणखीन एक पुरावा समोर आलाय. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून पाकिस्तानमध्ये बनवलेल्या वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत.

यामध्ये वायरलेस, क्यू-मोबाइल सेट्स, डिजिटल मोबाइल रेडिओ, जीपीएस पाकिस्तानात उत्पादित अशा गोष्टींचा समावेश आहे. हल्ल्यात घुसलेले दहशतवादी पाकिस्तानमध्येही त्यांच्या मालकांशी सतत संपर्कात होते. या घटनेनंतर पाकिस्तानचं षड्यंत्र पुन्हा एकदा उघडकीस आलं आहे.

सूत्रांनी सांगितलं की, कलम ३७० च्या तरतुदीतील बदलानंतर पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयनं जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझरचा भाऊ अब्दुल रऊफ याच्यावर कश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्यासाठी जबाबदारी सोपवली होती. यासाठी पुलवामा मध्ये झालेल्या हल्ल्या पेक्षाही मोठा हल्ला घडवून आणण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. या हल्ल्याची रणनीती आखण्यासाठी आयएसआय, अब्दुल रऊफ असगर आणि काजी तरार सहभागी होते.

बहावलपूरमध्ये झालेल्या बैठकीत जैशच्या दहशतवादी नेटवर्कचे मौलाना अबू जुंदल आणि मुफ्ती तौसीफही सहभागी होते. सुरुवातीच्या योजनेनंतर जयेशच्या शकरगड युनिटला दहशतवाद्यांची निवड व प्रशिक्षण यासह अंतिम तयारी पूर्ण करण्याचं काम देण्यात आलं. चार अतिरेक्यांनी आत्मघाती हल्ल्याचं प्रशिक्षण घेतलं आणि काश्मीर खोऱ्यात भारतीय चौक्यांना जास्तीत जास्त नुकसान पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त स्फोटक शक्तीचा वापर करण्याचा सराव केला.

जैश अतिरेकींनी सीमा ओलांडून सांबा सेक्टर मधील नाल्यांचा वापर करीत भारतीय सीमेमध्ये घुसखोरी केली आणि जम्मूमध्ये कठुआकडे जाणाऱ्या सांबापासून सहा किलोमीटर अंतरावर जटवालजवळ ट्रकवर चढले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा