पुणे, दिनांक २४ सप्टेंबर २०२२ : जीवाची मुंबई करण्यासाठी दारूच्या नशेत एका सिक्युरिटी गार्डचा मोबाईल आणि दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांच्या कोंढवा पोलिसांनी मुस्क्या आवळल्या आहेत. आरोपीकडून पुण्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तब्बल पंधरा गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
अटक केलेल्या आरोपींकडून सात दुचाकी वाहने, दहा मोबाईल संच, दोन लॅपटॉप, अॅपल कंपनीचे दोन आयपॅडसह तब्बल ३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यश सागर ओंबळे (वय २१) पृथ्वीसिंग नारंगसिंग गिल (वय २४) दोघेही रा. येरवडा, पुणे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. पोलीस कोंढवा परिसरातील भगवाचौक येथील सिध्दी विहार येथून चोरीला गेलेल्या दुचाकीचा तपास करीत होते. त्यावेळी त्यांना अॅक्टीव्हा दुचाकी गाडी वरून दोघेजण परिसरात गाड्यांची टेहाळणी करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
कोंढवा पोलिसांकडून आरोपीकडे अधिक तपास केला असता, आरोपींनी कोंढवा पोलिस ठाण्याअंतर्गत चोरीचे चार, हिंजवडी पोलिस ठाण्याअंतर्गत घरफोडीचे तीन आणि चोरीचा एक गुन्हा, वानवडी पोलिस ठाण्याअंतर्गत चोरीचे दोन गुन्हे तसेच हडपसर पोलिस स्टेशन, चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन, स्वारगेट पोलिस स्टेशन, विमानतळ पोलिस स्टेशन, आणि विश्रांतवाडी पोलिस स्टेशन हद्दीतील प्रत्येकी एक गुन्हा असे तब्बल १५ गुन्हे कोंढवा पोलिसांकडून उघड केले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अनिल खळदकर