रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या वाढलेल्या फांद्यामुळे अपघाताची शक्यता

पुणे, दि. ३ जून २०२०: मान्सून पूर्व पावसाला काल शहरांमध्ये सुरुवात झाली. निसर्ग चक्रीवादळामुळे काल पुण्यामध्ये सर्वत्र मुसळधार पावसाची नोंद झाली. कोविड -१९ च्या काळामध्ये अनेक शासकीय कामे बंद होती त्यामध्ये अतिक्रमण विभाग व इतर संबंधित कामे देखील महानगरपालिकेकडून काही प्रमाणात थांबविण्यात आली होती. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे तसेच रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर लावण्यात आलेली शोभेची झाडे अस्तव्यस्त वाढली आहेत.

रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या वाढलेल्या फांद्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे. वेळप्रसंगी अपघात होण्याची देखील शक्यता आहे. त्यातच कालपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे आता या फांद्या तुटून रोडवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक देखील ठप्प होऊ शकते.

महानगरपालिकेने शहरातील काही ठिकाणांवरील झाडांची छाटणी करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र अजूनही शहरातील काही भागांमध्ये झाडांच्या वाढलेल्या फांद्या अडथळे निर्माण करत आहेत. संबंधित भागांमधील नागरिक वार्ड ऑफिस मध्ये त्याबाबत तक्रारी सुद्धा करत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून पावसाळा सुरू होण्याच्या आतच ही कामे होणे अपेक्षित आहे. औंध भागात देखील रस्त्यांवरील बरीच झाडे अस्तव्यस्त वाढलेली आहेत. त्यामुळे ही झाडे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांना लागण्याची शक्यता आहे. तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत बनवण्यात आलेल्या सिमेंट रोडवर दुभाजकाच्या मध्ये लावलेली शोभेची झाडे देखील दुभाजकाच्या बाहेर डोकावत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा