नवी दिल्ली, १७ जुलै २०२१: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातमधे, रेल्वेच्या अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि राष्ट्रार्पण दूरदृश्य प्रणाली द्वारे केले. यावेळी गुजरात सायन्स सिटी मधल्या एक्वेटिक्स आणि रोबोटिक्स गॅलरीचे आणि नेचर पार्कचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. गांधीनगर राजधानी- वाराणसी अतिजलद गाडी आणि गांधीनगर राजधानी ते वरेठा दरम्यानच्या मेमू सेवा गाडी या दोन नव्या गाड्यांना पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला.
गांधीनगर राजधानी रेल्वे स्थानकाची वैशिष्ट्ये
नुतनीकरण करण्यात आलेले गांधीनगर राजधानी रेल्वे स्थानक हे एखाद्या आधुनिक विमानतळाप्रमाणे भासते. महात्मा मंदिर कन्व्हेन्शन अॅन्ड एक्झीबिशन सेंटर पासून काही पावलांवर असलेल्या या रेल्वे स्थानकाला हरित इमारत वैशिष्ट्ये पुरवण्यात आली आहेत. विशेष तिकीट आरक्षण खिडकी, रॅम्प, उद्वाहने,समर्पित पार्किंग जागा पुरवत हे स्थानक दिव्यांग स्नेही राहील याची खास काळजी घेण्यात आली आहे.
प्रदर्शने, परिषदा यासारखे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करण्यासाठी, महात्मा मंदिर कन्व्हेन्शन अॅन्ड एक्झीबिशन सेंटर हे पसंतीचे स्थान ठरत आहे. इथे सुयोग्य कनेक्टीव्हिटी आणि निवास सुविधांचा अभाव होता. हे लक्षात घेऊन गांधीनगर राजधानी रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करताना यात ३१८ खोल्या असणाऱ्या उत्तम हॉटेलचा समावेश करण्यात आला आहे.
या स्थानकात मध्यवर्ती वातानुकुलीत ४० आसनाची सुविधा असणारे प्रतीक्षा गृह आहे. प्रवेश आणि निर्गमन यासाठी वेगवेगळी असणारी द्वारे निसर्गरम्य परीसराने वेढलेली आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे