वैद्यकीय ऑक्सीजनच्या पुरवठ्याबाबत प्रधानमंत्री यांनी घेतला आढावा

नवी दिल्ली, १७ एप्रिल २०२१: वैद्यकीय उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत रहावा याकरता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल आढावा बैठक घेतली. यासंदर्भात केंद्रसरकारचे विविध विभाग आणि राज्य सरकारांदरम्यान ताळमेळ राखावा, ऑक्सीजनची आंतरराज्य वाहतूक विना अडथळा व्हावी तसंच मेडीकल ऑक्सीजनचं उत्पादन वाढवावं, अशा सूचना प्रधानमंत्र्यांनी दिल्या.

सध्या देशभरात होत असलेल्या ऑक्सिजन पुरवठ्याविषयी आणि येत्या १५ दिवसांत कोविड रुग्णसंख्या अधिक असलेल्या १२ राज्यांत किती ऑक्सिजन लागू शकेल, या विषयीही पंतप्रधानांनी विस्तृत आढावा घेतला. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश, दिल्ली, छत्तिसगढ, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यात सध्या कोविडची रुग्ण संख्या अधिक आहे. या सर्व राज्यांमधील जिल्हानिहाय स्थितीचे सादरीकरण यावेळी पंतप्रधानांसमोर करण्यात आले.

केंद्र आणि राज्य सरकारे एकमेकांच्या सतत संपर्कात असून, २० एप्रिल, २५ तसेच ३० एप्रिल रोजी देशात ऑक्सिजनची अंदाजे किती मागणी असू शकेल, याची माहिती सर्व राज्यांना देण्यात आली आहे, असे पंतप्रधानांना यावेळी सांगण्यात आले. त्यानुसार, या तीन तारखांना अनुक्रमे, ४,८८० मेट्रिक टन, ५,६१९ मेट्रिक टन आणि ६,५९३ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज पडू शकेल.

देशात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता, ती पूर्ण करण्यासाठी, ऑक्सिजन निर्मितीची क्षमतेविषयी देखील पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. प्रत्येक प्रकल्पाच्या सध्याच्या ऑक्सिजन निर्मिती क्षमतेत वाढ करावी, अशी सूचना त्यांनी यावेळी दिली. तसेच, पोलाद निर्मिती प्रकल्पांमध्ये असलेला अतिरिक्त ऑक्सिजन साठा देखील वैद्यकीय उपयोगासाठी वापरला जावा, यावरही या बैठकीत चर्चा झाली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा