पंतप्रधान 26-28 जून दरम्यान जर्मनी आणि युएईला देणार भेट

नवी दिल्ली, 23 जून 2022: जर्मनीचे चॅन्सलर महामहीम ओलाफ शोल्झ यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीतील श्लोस एलमाऊला भेट देणार आहेत. 26-27 जून 2022 रोजी जर्मनीच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जी- 7 शिखर परिषदेत ते सहभागी होतील. शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधान पर्यावरण, ऊर्जा, हवामान, अन्न सुरक्षा, आरोग्य, लैंगिक समानता आणि लोकशाही या मुद्यांवर दोन सत्रांमध्ये विचार मांडणार आहेत. या महत्त्वाच्या मुद्यांवर आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्यासाठी अर्जेंटिना, इंडोनेशिया, सेनेगल आणि दक्षिण आफ्रिका सारख्या अन्य लोकशाही देशांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान काही सहभागी देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतील.

जी 7 शिखर परिषदेचे निमंत्रण भारत आणि जर्मनी यांच्यातील मजबूत आणि घनिष्ठ भागीदारी आणि उच्चस्तरीय राजकीय संबंधांच्या परंपरेला अनुसरून आहे. सहाव्या भारत-जर्मनी आंतर-सरकारी सल्लामसलत बैठकीसाठी (IGC) 2 मे 2022 रोजी पंतप्रधानांनी जर्मनीला शेवटची भेट दिली होती.

जी 7 शिखर परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर, पंतप्रधान 28 जून 2022 रोजी संयुक्त अरब अमिरातीचे माजी राष्ट्रपती आणि अबु धाबीचे शासक महामहीम शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीला भेट देणार आहेत. संयुक्त अरब अमिरातीचे नवे राष्ट्रपती आणि अबु धाबीचे शासक म्हणून शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची निवड झाल्याबद्दल पंतप्रधान त्यांचे अभिनंदन देखील करतील. त्याच रात्री 28 जून रोजी पंतप्रधान यूएईहून मायदेशी रवाना होतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा