पंतप्रधान येत्या १४ फेब्रुवारीला तामिळनाडू आणि केरळच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली, १३ फेब्रुवरी २०२१: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १४ फेब्रुवारीला तामिळनाडू आणि केरळचा दौरा करणार आहेत. यावेळी १४ तारखेला सकाळी ११ च्या सुमाराला चेन्नईत पंतप्रधानांच्या हस्ते महत्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण होईल आणि अनेक प्रकल्पांचा कोनशिला समारंभही होईल. तसेच अर्जुन मेन बॅटल टँक लष्कराला सुपूर्द करण्याचा समारंभही त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजताच्या सुमाराला पंतप्रधान कोच्ची येथे विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करतील. या प्रकल्पांमुळे दोन्ही राज्यांच्या विकासाला महत्वाची गती मिळेल आणि या राज्यांची विकासक्षमता पूर्णपणे वापरण्याचा वेग वाढेल.
पंतप्रधानांचे तामिळनाडूमधील कार्यक्रम
पंतप्रधानांच्या हस्ते चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-२, विस्तारचे उद्‌घाटन होईल. ३७७० कोटी रुपयांच्या खर्चाने बांधण्यात आलेल्या या मेट्रोमुळे वॉशरमेट ते विम्को नगर या मार्गावर मेट्रो सुविधा उपलब्ध होईल. ८.०५ किमी लांबीच्या या विस्तारामुळे उत्तर चेन्नईला विमानतळ आणि मध्यवर्ती रेल्वे स्थानकाशी जोडले जाईल.
तसेच चेन्नई बीच ते अट्टीपट्टू दरम्यानच्या चौथ्या रेल्वे मार्गाचेही उद्‌घाटन पंतप्रधान करतील, हा २२.१ किमीचा पट्टा २९३.४० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला असून तो चेन्नई आणि तीरुवल्लूवर या जिल्ह्यांतून जातो. या मार्गामुळे चेन्नई पोर्टकडून येणारी वाहतुककोंडी सुटण्यास मदत होईल. या पट्टा चेन्नई पोर्ट आणि एन्नोर पोर्ट ला जोडणार असून महत्वाच्या यार्डातून जाणार आहे. यामुळे गाड्यांची वाहतूकही सुरळीत होईल.
पंतप्रधानांच्या हस्ते विल्लूपूरम-कुड्दालोर-मयीलाडूथुराई-तंजावर आणि मयीलाडूथुराई तीरुवरूवर या रेल्वेमार्गांच्या विद्युतीकरण प्रकल्पाचेही उद्‌घाटन होईल. ४२३ कोटी रुपयांच्या २२८ किमी लांबीच्या एकल मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले असून त्यामुळे चेन्नई एग्मोर आणि कन्याकुमारी या मार्गावर ट्रॅक्शन न बदलताही निर्वेध प्रवास होऊ शकेल, ज्यामुळे दररोज १४.६१ लाख रुपयांच्या  इंधनाची बचत होईल.
या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान अत्याधुनिक अशा अर्जुन मेन बॅटल टँक (MK-1A) भारतीय लष्कराला हस्तांतरित करतील. या बॅटल टँकचे डिजाईन, विकास आणि उत्पादन संपूर्णपणे स्वदेशी असून डीआरडीओच्या CVRDE संस्थेसह १५ शैक्षणिक संस्था, ८ प्रयोगशाळा आणि कित्येक एमएसएमई कंपन्यांच्या मदतीने हा टँक तयार करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे यावर्षी तामिळनाडू आणि केरळमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.  भारतीय जनता पार्टी (भाजप) तमिळनाडूमध्ये एआयडीएमकेशी करार करून केरळमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे.  पंतप्रधानांची ही भेट दक्षिणेत शिरकाव करण्याचा प्रयत्न करणार्‍या भाजपसाठी महत्वाची मानली जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा