नियम पाळले तरच सुटेल वाहतूक कोंडीचा प्रश्न

आकुर्डी, ११ जानेवारी २०२३ : पिंपरी-चिंचवड शहरातील बेशिस्त वाहतूक समस्येने गंभीर वळण घेतले आहे. प्रत्येक रस्त्यावर वारंवार ट्रॅफिक जाम होत आहे. ना कुठल्या नियमांचे पालन होत आहे ना ते मोडणाऱ्यांवर प्रभावी कारवाई होताना दिसते. झपाट्याने वाढत जाणाऱ्या या शहरातील वाहतुकीची समस्या नेमकी कशामुळे उग्र रूप धारण करीत आहे, ती सोडविण्यासाठी नेमके काय करता येईल, हे ‘न्यूज अनकट’ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, काही नागरिकांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. केवळ पूल बांधून, रस्ते दुरुस्तीने प्रश्न सुटणार नाहीत, तर प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन केले तरच वाहतुकीची कोंडी फुटेल, असे उपाय त्यांनी स्पष्टपणे सुचविले.

चुकीला दंड आवश्यक : शहरातील वाहतुकीला शिस्त नाहीच. नियमांचे पालन होताना दिसत नाही. वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम वाहतूक पोलिसांचे आहे. मात्र, त्याचवेळी वाहतूक समस्यांबाबत शहरवासीयांमध्येही जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने वाहने चालविणाऱ्यांना तसेच नियम मोडणाऱ्यांना, सिग्नल चुकविणाऱ्यांना दंडही आकाराला पाहिजे.

  • कृष्णा खेमाजी पाटील, प्राधिकरण

स्वयंशिस्तीची गरज : मुंबईप्रमाणे वाहतूक नियमांबाबत शहरवासीयांमध्ये जाणीव तसेच जागृती दुर्दैवाने नाही. शहरात बहुतांश ठिकाणी फुटपाथ नाहीत आणि जिथे आहेत, तिथे त्यावर अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर ताण येताना दिसतो. याकडे महापालिका प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष असते. नागरिकांमध्ये स्वयंशिस्त असेल तर अनेक प्रश्न, समस्या सुटू शकतात. केवळ सिस्टीमला दोष देऊन चालणार नाही.

  • हरिदास कोलते-पाटील, आकुर्डी

घरापासूनच शिस्त लावावी : मुळात महापालिका, पोलिस यंत्रणा व लोकसहभागातूनच शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटू शकेल. प्रशासकीय यंत्रणेच्याही प्रत्यक्षात काही अडचणी, काही मर्यादा आहेत. नागरिकांनी स्वत:ला शिस्त लावली, तर काही प्रमाणात प्रश्न निश्चितच सुटू शकतील. त्यासाठी मी माझ्या घरापासून वाहतूक शिस्तीबाबत सुरुवात केली पाहिजे. नागरिकांच्या सहभागाशिवाय प्रश्न सुटणार नाहीत.

  • अरुण पळणीटकर, प्राधिकरण.

‘नो व्हेइकल दिवस’ हवा : महापालिका, पोलिस यंत्रणा, महापालिका, नागरिक, पुढारी यांचा सक्रिय सहभागातून वाहतूक समस्या सुटू शकते. पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून त्यासाठी निश्चित जागा नाहीत. आठवड्यातून एक दिवस ‘नो व्हेइकल दिवस’ सुरू केला पाहिजे.

  • एक जेष्ठ नागरिक, आकुर्डी.

गतिरोधकांची संख्या वाढवा : मुख्य रस्त्यांवर गतिरोधकांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. ही संख्या वाढवावी त्यामुळे वाहनांची गती मर्यादित होईल. पोलिसांची संख्या तोकडी असेल तर सेवाभावी संस्था, एनसीसी, स्काऊट गाइडच्या विद्यार्थ्यांची मदत घ्यावी. यामुळे वाहतुकीस काही प्रमाणात शिस्त लागेल.

  • अनिल नाईक

शाळा, रुग्णालयांच्या आवारात ट्रॅफिक पोलिस असणे गरजेचे आहे. एकाने वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे नसून यात सक्रिय सहभाग असावा. महिला संघटना, युवक मंडळांनी आपला काही वेळ जर वाहतुकीस शिस्त लावण्यात स्वयंस्फूर्तीने दिला तर वाहतुकीची कोंडी काही अंशी कमी होईल.

  • अशोक दाणेकर

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा