जेऊरमध्ये बैलांच्या पाठीवरील ‘गो कोरोना’ च्या घोषणा ठरल्या लक्षवेधी

पुरंदर, दि. ६ जुलै २०२०: पुरंदर तालुक्यातील जेऊर, मांडकी, निरा, लपतळवाडी, पिसुर्टी आदि परिसरामध्ये पारंपारिक पद्धतीने काल लाडक्या सर्जा-राजाचा आषाढी बेंदूर साजरा करण्यात आला. यावेळी शेतकऱ्याने पाठीवर रंगवलेल्या कोरोना जनजागृती संदर्भातील घोषणा व चित्रे लक्षवेधी ठरली

काल शनिवार(दि.४)आषाढी बेंदूर निमित्त जेऊर (ता.पुरंदर) येथील अजय पांडुरंग पवार या तरूण शेतकऱ्याने शासनाच्या आदेशानुसार कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बेंदूर साधेपणाने साजरा केला. घरीच बैलांना अंघोळ घातली.शिंगावर घुंगराच्या पितळी छमक्या, गळ्यात गेजा, पितळी घंडी बांधली. आपल्या सोन्या व लक्ष्या या लाडक्या बैलांवर कोरोना रोगाची संबंधित जनजागृतीपर अनोखे संदेश रेखाटून बैलांना सजविले.

त्यात ‘गो कोरोना’, ‘मास्कचा वापर करा’, ‘घरी रहा सुरक्षित रहा’ या आणि अशा विविध घोषणा रंगवून बळीराजाने कोरोना विषयीच्या जनजागृतीपर संदेश दिला. बेंदूरनिमित्त या तरूणाने बैलांची केलेली आगळीवेगळी सजावट व बैलांच्या पाठीवर लिहिलेला संदेश गावात लक्षवेधी ठरला. तद्नंतर त्यांना गोड पुरणपोळीचा घास भरवीत त्यांच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करुन बेंदूर सण साजरा करण्यात आला

याबाबत बोलताना अजय पवार म्हणाले कि, शेतातील पेरणी, मशागतीच्या कामांसह माल वाहतुकीसाठी बैलांची मदत यांत्रिक युगातही घेतली जात आहे.परंतु महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. पिकांना हमीभाव मिळत नाही, इंधनाचे वाढते दर त्यातच नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी हैराण झाला आहे.दुष्काळजन्य परिस्थितीत बैलांचा सांभाळ करणे डोईजड होत आहे.

त्यातच कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बेंदूर सार्वजनिकरित्या साजरा करणे शक्य नसल्याने घरीच त्यांची यथोचित पुजा करुन मी कृतज्ञता व्यक्त केली आहे. मात्र अशा भयाण परिस्थीतही माणसाने माणसाला दिलेल्या सूचना माणुस पाळत नसल्याने कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाबाबत लोकांनी जागृत व्हावे यासाठी अखेर हा पर्याय निवडला आहे. जनावरांच्या माध्यमातून तरी लोकांपर्यंत हा संदेश पोहचावा यासाठी हा प्रयत्न केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा