कोव्हॅकसिनची चाचणी पूर्ण नसतानादेखील मान्यता कशी, काँग्रेसनं उपस्थित केला प्रश्न

नवी दिल्ली, ४ जानेवारी २०२१: भारत बायोटेक ला डीसीजीआयकडून कोरोना लस वापरण्यास परवानगी दिल्याने राजकीय वाद सुरू झाला आहे. शशी थरूर आणि जयराम रमेश या दोन बड्या नेत्यांनी इंडिया बायोटेक व्हॅक्सीन कोव्हॅकसिनला ग्रीन सिग्नल देण्यावर चिंता व्यक्त केली आहे. मात्र, कॉंग्रेस नेत्यांच्या वक्तव्यानंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पलटवार केला आहे.

थरूर यांचे विधान

शशि थरूर यांनी म्हटले आहे की, “कोव्हॅकसिनने अद्याप तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेतली नाही. या लसला यापूर्वीच परवानगी देण्यात आली असून ही धोकादायक ठरू शकते.” कॉंग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनीही असेच प्रश्न उपस्थित केले आहेत आणि या संदर्भात आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे जाब विचारला आहे.

जेपी नड्डा यांचा पलटवार

कॉंग्रेस नेत्यांच्या वक्तव्यानंतर भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले की, ‘आम्ही हे वारंवार पाहिले आहे की जेव्हा भारत एक मोठी उपलब्धी मिळवतो म्हणजे भविष्य भारतीयांसाठी मोठी लाभदायक ठरणार असते तेव्हा तेव्हा काँग्रेस अशा गोष्टींवर चुकीच्या पद्धतीने आक्षेप घेते जे तथ्य हीन असते.’

हर्षवर्धन यांनीही ट्विट केले

त्याचवेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आपल्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, ‘अशा महत्त्वाच्या विषयावर राजकारण करणे लज्जास्पद आहे. शशि थरूर, अखिलेश यादव, जयराम रमेश यांनी कोरोना लसीच्या मंजुरीसाठी वैज्ञानिकांनी पाठविलेल्या प्रोटोकॉलची बदनामी करू नये.’

काल ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेक व्हॅक्सीन कोव्हॅकसिनच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. या ग्रीन सिग्नलनंतर ही लस सर्वसामान्यांना लागू होऊ शकते.

मात्र, काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी असे म्हटले आहे की, “कोव्हॅकसिन ची अद्याप तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झालेले नाही. त्यास दिलेली परवानगी अपरिपक्व आहे आणि हे उचललेले पाऊल धोकादायक असू शकते. याबाबत हर्षवर्धन यांनी स्पष्टीकरण द्यावे,” असे थरूर म्हणाले. “लसची चाचणी पूर्ण होईपर्यंत याचा वापर करू नये. तोपर्यंत भारत अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसद्वारे काम होऊ शकते.”

अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेली लस पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटने तयार केली आहे. कोविशिल्ड असे या लसीचे नाव आहे.

शशी थरूर यांच्यानंतर कॉंग्रेसचे नेते जयराम रमेश यांनीही हाच प्रश्न उपस्थित केला आहे. जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, “भारत बायोटेक एक नवीन कंपनी आहे, परंतु हे आश्चर्यकारक आहे की कोव्हॅक्सिनसाठी फेज तीनशी संबंधित प्रोटोकॉलमध्ये बदल केले जात आहेत. या संदर्भात आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी स्पष्टीकरण द्यावे.”

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा