संजय राऊतांच्या वक्तव्याचे डोंबिवलीत पडसाद ….

डोंबिवली, १७ ऑगस्ट २०२०: शिवसेनेचे नेते संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत . संजय राऊत हे आधी सूशांत सिंग राजपूतमुळे तर आता डॉक्टर आणि कंपाउंडर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.

WHO म्हणजे इकडून तिकडून गोळा केलेल्या माणसांचा एक गट आहे. त्यांच्यामध्ये डॉक्टर असले म्हणून काय झालं? खरंतर डॉक्टरांपेक्षा कम्पाउंडरला जास्त कळतं. मी कधीच डॉक्टरांकडून औषध घेत नाही. कम्पाउंडरकडून औषध घेतो. त्यांना जास्त कळतं. तुम्ही त्या WHO वाल्यांच्या नादाला लागू नका. त्यांच्यामुळंच कोरोना वाढलाय,’ असं वक्तव्य राऊत यांनी केल होत. मात्र संजय राऊत यांनी डॉक्टर आणि कंपाउंडर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा भाजपनं डोंबिवलीत पत्रकार परिषद घेत निषेध केला. राऊतांनी केलेलं वक्तव्य हे डॉक्टरांचं मानसिक खच्चीकरण करणारं असल्याचं भाजपनं म्हटलं आहे .

डॉक्टर हे त्यांचा जीव धोक्यात घालून रूग्णांवर उपचार करतात, रूग्णांना सेवा देतात. सध्या कोरोनाच्या काळात डॉक्टर्स जीव धोक्यात घालून आपल्यासाठी लढत असून अशात कौतुक करणं सोडून डॉक्टरांबद्दल असं वक्तव्य करणं, हे डॉक्टरांचं मानसिक खच्चीकरण करणारं असल्याचं मत भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी व्यक्त केलं. सोबतच कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे हे स्वतः डॉक्टर असल्यानं त्यांनीच याबाबत खुलासा करावा, अशी मागणी कांबळे यांनी केली, तर खासदारांकडे मागणी करणारे कांबळे हे स्वतः डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाणांचे कंपाउंडर आहेत.

यावर शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी प्रतिउत्तर दिले आहे , त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांना अशा मागण्या करू नये, अन्यथा त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा दिला आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत सध्या भाजप शिवसेना कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येकडे कमी आणि राजकारणाकडे जास्त लक्ष देताना दिसत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा