सचिन वाझे प्रकरणात मर्सिडिज कारची भूमिका महत्वाची

मुंबई, १७ मार्च २०२१: मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन प्रकरणात एक नवा खुलासा आता समोर येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. मनसुख हिरेन यांनी मृत्यूपूर्वी ज्या गाडीतून प्रवास केला होता त्या गाडीचा तपास सुरू करण्यात आला होता. यासंबंधी आता महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन वाझे प्रकरणात इनोव्हा कारची माहिती मिळाल्यानंतर एनआयए एका मर्सिडिज कारच्या शोधात होती. त्यानंतर संबंधित मर्सिडीज काल एनआयएकडून जप्त करण्यात आली.

या मर्सडीज गाडीच्या डिक्की ची तपासणी अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या डिक्कीत काही कपडे आणि अन्य काही वस्तू सापडल्याचं प्रथमदर्शनी पाहायला मिळत आहे. महत्वाची बाब म्हणजे या तपासणीदरम्यान व्हिडीओ रेकॉर्डिंगही केलं जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात या मर्सिडिज कारची भूमिका स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ इतकीच महत्वाची असल्याचे बोलले जात आहे.

या प्रकरणात दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या मर्सडीज गाडी संबंधी एन आय ए च्या हाथी एक महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज लागले आहे. संबंधित सीसीटीव्ही फुटेज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. या कार मधूनच मनसुख हिरेन यांनी शेवटचा प्रवास केला होता. या कार मधूनच मनसुख हिरेन यांनी प्रवास केल्याचे दिसत आहे परंतु, तत्पूर्वी ते संबंधित ठिकाणी कोणाचीतरी वाट पाहत असल्याचे देखील निदर्शनास आले आहे. या दरम्यानच मनसुख हिरेन बेपत्ता झाले होते.

महत्वाची बाब म्हणजे ही मर्सिडीज कार स्वत: सचिन वाझेच वापरत असल्याची माहिती समोर येत आहे. या कारला अनेकदा बनावट नंबर प्लेट लावण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे आता या मर्सिडीज कारच्या डिक्कीतून एनआयएच्या हाती नेमके कोणते पुरावे लागतात हे महत्वाचे ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा