रुपया घसरत नाही, तर डॉलर मजूबत होत आहे

8

नवी दिल्ली, १६ ऑक्टोंबर २०२२ : मागील काही दिपसांपासून जागतिक पातळीवर घडणाऱ्या घडामोडींमुळे रुपयाचे सातत्याने अवमूल्यन होत आहे. मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रुपयाचे मूल्य तब्बल ८३ पैशांनी घसरले होते. गेल्या सात महिन्यांतील ही सर्वात मोठी पडझड होती. मागील काही दिवसांपासून रुपयाची सातत्याने पडझड होत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रूपया घसरत नसून डॉलर सातत्याने मजबूत होत आहे, असे त्या म्हणाल्या आहेत.

निर्मला सीतारमन नेमकं काय म्हणाल्या

सीतारामन म्हणाल्या की, रुपयाचे अवमूल्यन होत नसून डॉलर मजबूत होत आहे. तसेच रुपया इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहे. रुपयाची घसरण रोखण्यासाठी आरबीआय, सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचेही सीतारामन यांनी सांगितले.निर्मला सीतारामन या अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. वॉशिंग्टन डीसीमध्ये पत्रकार परिषदेच्या पत्रकाराने त्यांना रुपयाच्या घसरणीबद्दल विचारले तेव्हा अर्थमंत्री म्हणाल्या, की मी याकडे घसरण म्हणून पाहात नाही. रुपयाची घसरण होतेय असं न पाहता, डॉलर मजबूत होतोय. त्यामुळे सहाजिकच डॉलरच्या तुलनेतील चलने कमकुवत होतील, असंही सीतारामन यांनी म्हटलं. इतर चलनांच्या तुलनेत भारतीय चलनाने चांगली कामगिरी केली आहे. अस्थिरतेला तोंड देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक प्रयत्न करत आहे, असेही निर्मला सीतारामन म्हणाल्या.

रुपया डॉलरच्या तुलनेत सार्वकालिक निचांकी पातळीवर आहे. शुक्रवारी रुपया ८ पैशांनी गटांगळ्या खात डॉलरच्या तुलनेत ८२.३२ रुपयांवर पोहोचला. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ८२.२४ झाले होते. अशा परिस्थितीत निर्मला सीतारामन यांनी रुपयाची घसरण होत नसून डॉलर मजबूत स्थितीत पोहोचत आहे, असे विधान केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा