नंदीग्राम, १ एप्रिल २०२१: पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये गुरुवारी विधानसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. बंगालमध्ये ३० विधानसभा जागांसाठी १७१ उमेदवार रिंगणात आहेत, तर आसामच्या ३९ जागांवर ३४५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. आजच्या मतदानाच्या ठिकाणी नंदीग्रामवर सर्वांचे लक्ष लागून आहे जिथून ममता बॅनर्जी आणि शुभेंदू अधिकारी आमनेसामने आहेत. नंदीग्रामसह मतदान क्षेत्रात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
बंगालमधील निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यात आज ४ जिल्ह्यातील ३० विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील ९ बांकुरा मधील ८, पश्चिम मेदिनीपुरात ९ आणि दक्षिण २४ परगणा मधील ४ जागांवर मतदान होणार आहे. मतदानादरम्यानची तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता नंदीग्रामसह अनेक भागात कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
ममता आणि शुभेंदु दोघांचे वर्चस्व धोक्यात
तथापि, दुसर्या टप्प्यातील निवडणुकीत पश्चिम बंगालमधील सर्वात हाय प्रोफाइल असलेली नंदीग्राम जागादेखील समाविष्ट आहे, जिथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपाचे शुभेंदू अधिकारी रिंगणात आहेत. काही महिन्यांपूर्वी टीएमसी सोडलेल्या आणि भाजपमध्ये दाखल झालेल्या शुभेंदू यांचे वर्चस्व देखील आता धोक्यात आले आहे, त्यामुळे ममता बॅनर्जी नंदीग्राम जागा जिंकण्यासाठी कसलीही कसर सोडणार नाही. ममतांनी या भागात मोठ्या प्रमाणावर रॅली आणि निवडणूक सभा घेतल्या आहेत.
मंगळवारी निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांच्या समर्थनार्थ भाजपकडून जोरदार मोहीम राबविण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही नंदीग्राममध्ये रॅली व रोड शो आयोजित केला. नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनीही नंदीग्राममध्ये रोड शो करून वातावरण निर्माण केले.
मतदानापूर्वी नंदीग्रामच्या सीमा सीलबंद
मतदानाच्या एक दिवस आधी बुधवारी भाजप नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली की, नंदीग्राममध्ये बनावट मते मिळवण्यासाठी घुसखोरी केली जात आहे, ती त्वरित थांबवावी. कोलकाता येथील मुख्य निवडणूक अधिकार्यांकडे दिलेल्या तक्रारीत भाजपने म्हटले आहे की नंदीग्राममधील फेरी घाटातून बनावट मतदान करण्यासाठी घुसखोरी केली जात आहे, तर शुभेंदू अधिकारी अशा लोकांना बोलवित आहेत, असा टीएमसीचा आरोप आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे