Gonidia The death of stork bird: गोंदिया जिल्ह्यातील माकडी परिसरात आज सकाळी विजेच्या धक्क्याने एका सारस पक्ष्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना केवळ एका पक्षाचा घात नसून, पर्यावरणीय असंतुलन आणि दुर्लक्षित संवर्धनाच्या दिशेने गंभीर इशारा आहे. विशेष म्हणजे, मृत सारस पक्ष्याला दोन महिन्यांपूर्वी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने अभ्यासासाठी GPS-GSM ट्रान्समीटर बसवले होते. मात्र, ११ केव्हीच्या विद्युत तारा स्पर्श केल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला.


महाराष्ट्रातील गोंदिया जिल्हा सर्वाधिक सारस पक्ष्यांचे निवासस्थान म्हणून ओळखला जातो. मात्र, संरक्षणाच्या अपुऱ्या उपाययोजनांमुळे येथील सारस पक्ष्यांची संख्या झपाट्याने घटत असल्याचे चित्र पाहायला दिसत आहे. सन २००८ मध्ये ५२ असलेली ही संख्या आता केवळ २६ वर आली आहे. नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास, अन्नसाखळीतील बदल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, असुरक्षित विद्युत तारा यांचा समावेश हे सारस पक्षांच्या घटी मागचे प्रमुख कारण मानले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाची जनहित याचिका दाखल पण “परिस्थिती जैसे थेच”:
पक्ष्यांच्या संरक्षणासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून जनहित याचिका दाखल केली होती. त्यामध्ये न्यायालयाने प्रशासनाला त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, प्रत्यक्षात कोणताही सकारात्मक बदल झालेला नाही. याचबरोबर गोंदिया तालुका आणि परिसरातील उच्चदाब विद्युत तारांची दुरुस्ती करण्यासाठी ४८ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. मात्र, तो सुद्धा निधी अद्याप मंजूर झालेला नाही. परिणामी, अशा दुर्दैवी घटनांची मालिका थांबण्याऐवजी वाढतच आहे.
सारस पक्ष्यांचे भवितव्य धोक्यात :
सारस पक्ष्यांचे संवर्धन आणि त्यांच्या संरक्षणासाठी तातडीने ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर भविष्यात त्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होऊ शकतो. विद्युत तारा कोटींग करणे, त्यांचा अधिवास सुरक्षित करणे, तसेच अधिकृत संवर्धन योजना अमलात आणणे गरजेचे आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी,नविन दहिकर