इंदापूर, ११ ऑक्टोबर २०२०: इंदापूर तालुक्यातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाची कमालीची दुरवस्था झाली आहे. नुकताच पावसाळ्याच्या अगोदर डागडुजी करण्यात आली होती, मात्र पावसाळ्यात महामार्गावर केलेली डागडुजी पाण्यात गेली.
या महामार्गालागतच सेवा रस्ता आहे. राष्ट्रीय महामार्गावर कमालीची वर्दळ असल्याने स्थानिक प्रवासी, विशेषतः दुचाकीस्वार या सेवा रस्त्याचा वापर करतात. पण या सेवा रस्त्याला देखील काटेरी झुडपांचे ग्रहण लागल्याचे सध्या पहावयास मिळत आहे. कोरोनाचे कारण पुढे करत महामार्ग प्रशासन त्यामध्ये मशगुल असल्याचे दाखवित आहे. तर दुसरीकडे राजरोसपणे या रस्त्यांवर लहान-मोठे अपघात घडत आहेत. मात्र महामार्ग प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
महामार्ग लगतच असणाऱ्या रस्त्याचा वापर स्थानिक प्रवासी शेतकरी कृषीमाल वाहतूक करणारी वाहने करीत असतात. याच मार्गावर अनेक लहान मोठ्या संस्था साखर कारखाने असल्याने नागरिकांची विशेषतः स्थानिकांची या सेवा रस्त्यावरून वर्दळ होत असते. वाढलेल्या काटेरी झुडपामुळे नुकताच एक दुचाकीस्वाराला आपला प्राण गमवावा लागला आहे. प्रवाशांनी वारंवार मागणी करून देखील महामार्ग प्रशासनाने सेवा रस्त्यावरील काटेरी झुडपे अद्याप आठवलेली नाहीत.
सध्या अनेक साखर कारखान्यांचे गळीत हंगाम झाल्यावर याच सेवा रस्त्यावरून अनेक ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या ट्रॅक्टर तेजा करणार आहे. तरी महामार्ग प्रशासनाने गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच इंदापूर तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्ग लगतच्या सेवा रस्त्यांवरील काटेरी झुडपे वेळेस काढावीत अन्यथा भविष्यात अनेक अपघातांना आमंत्रण मिळायची शक्यता आहे.
न्यूज अनकट: प्रतिनिधी निखिल कणसे.