कल्याणमध्ये घडला धक्कादायक प्रकार, कोरोना नसतानाही रुग्णावर झाले कोरोनाचे उपचार

8

कल्याण, दि. ११ जुलै २०२०: कोरोनाच्या काळात खासगी रुग्णालयांचे अनेक धक्कादायक प्रकार समोर येत असताना कल्याणमध्ये आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. केवळ नाव सारखे असल्याच्या कारणावरून कोरोना नसलेल्या रुग्णाला कोरोना रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.

कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी परिसरात राहणाऱ्या नीता सावंत यांची ३ जुलै रोजी प्रकृती खालावल्याने त्यांना कल्याणच्या सिटी क्रीटीकेअर या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्याचे सांगत त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी कोरोनाची चाचणी पॉजीटीव्ह आल्याचे सांगत त्यांना ए एन्ड जी या कोवीड रुग्णालयात दाखल करण्यात आले. २ दिवस या ठिकाणी नीता यांच्यावर कोरोना संबधित उपचार करण्यात आले. रुग्णालयाकडून एक इंजेक्शन सांगितल्याने कुटुंबीयांनी मुंबई येथील मेडिकलशी संपर्क साधला.

मेडिकल चालकाने रिपोर्ट पाहताच सांगितले की हा रिपोर्ट तुमच्या रुग्णाचा नाही. कुटुंबीयांनी रिपोर्ट पाहिला असता त्यांना नाव नीता सावंत असले तरी वय ४५ वर्ष असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ ए एंड जी रुग्णालय गाठत याबाबत जाब विचारला. मात्र रुग्णालय प्रशासनाने आमच्याकडे आलेल्या रिपोर्टनुसार आम्ही उपचार केल्याचे सांगत जबाबदारी सिटी क्रिटिकेयरवर ढकलली. कुटुंबीयांनी सिटी क्रिटिकेयर तसेच लॅबला याबाबत जाब विचारला मात्र त्यांनीदेखील एकमेकांवर जबाबदारी ढकलली त्यानंतर कुटुंबीयांनी पालिका मुख्यालय गाठत आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेत हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयाविरोधात कारवाईची मागणी केली. दरम्यान नीता सावंत यांना सध्या उपचारासाठी कल्याणमधील मीरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पालिका प्रशासनाला याप्रकरणी तक्रार प्राप्त झाली असून शहानिशा करून कारवाई करूअशी प्रतिक्रिया केडीएमसीकडून देण्यात आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे