चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती अद्याप कायम

नागपूर, २ सप्टेंबर २०२० : विदर्भात जोरदार पाऊस आणि धरणाच्या पाण्याचा विसर्ग सुरु असल्यानं निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या १७५ गावांमधल्या ५३ हजारापेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवावं लागलं आहे. गेल्या काही दिवसात या चार जिल्ह्यांमधे जोरदार पाऊस आणि पूरस्थितीमुळे ९२ हजारापेक्षा जास्त लोकांना फटका बसला आहे.

राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती निवारण दल आणि लष्करासह ११ बचाव आणि मदत पथकं या भागात, विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात कार्यरत आहेत. आज दुपारी एक वाजेपर्यंत नागपूर विभागातल्या ५३ हजार २२४ लोकांना सुरक्षित स्थळी हलवल्याचं नागपूरच्या विभागीय आयुक्तालयानं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. भंडारा जिल्ह्यातल्या ७६, नागपूर ६१, चंद्रपूर २२, तर गडचिरोली जिल्ह्यातल्या १६ गावांना पुराचा फटका बसला असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भामरागड तालुक्याला भेट देऊन आठवडाभरापूर्वी तिथं उद्भवलेल्या पूर परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी आपतग्रस्त नागरिकांना रेशन, कपडे आणि इतर जीवनावश्यक साहित्याचं वाटप केलं. त्यानंतर शिंदे यांनी हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाला भेट दिली.

चंद्रपूर जिल्ह्यातल्या पोंभुर्णा तालुक्यात तसंच ब्रम्हपुरी तालुक्यातल्या लाडज गावात मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराच्या दोन तुकड्या तैनात केल्या आहेत. त्याठिकाणी आता पाणी कमी व्हायला सुरुवात झाली आहे, असं जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाधिकारी जितेश सुरवडे यांनी सांगितलं.

गडचिरोली जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून रविवारी सर्वाधिक ३० हजार ११७ क्युमेक पाणी सोडलं होतं. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. कालपासून धरणातून पाण्याचा विसर्ग कमी होतोय. आज दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार गोसेखुर्द धरणातून फक्त ५ हजार ७४३ क्युमेक पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे नद्या-नाल्यांचा पूर ओसरु लागला आहे. रस्त्यावरचं पाणीही कमी होत आहे. आज आरमोरी-ब्रम्ह्मपुरी आणि गडचिरोली-चंद्रपूर हे मार्ग सुरु झाले. मात्र गडचिरोली-आरमोरी आणि इतर मार्ग अजूनही बंदच आहेत. काल पहाटेपासून महसूल आणि पोलीस प्रशासनानं मच्छिमारांच्या मदतीनं १३७ जणांना पुरातून सुखरूप बाहेर काढले आहे.

भंडारा जिल्ह्यात पुरात अडकलेल्यांचा बचाव आणि शोध घेण्याचं काम सुरु असून राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या मदतीनं जिल्ह्यातल्या ४ हजार २०० कुटुंबाना तात्पुरत्या शिबीरात हलवलं आहे. पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून द्याव्यात, तसंच बाधित नागरिकांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार करून भविष्यात अशी आपत्ती उद्भवणार नाही यासाठीच नियोजन करावं, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असल्यानं जायकवाडी धरण ९२ टक्के भरलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा