‘गोल्डन ग्लोब’मध्ये ‘आरआरआर’मधील ‘नाटू नाटू’ गाण्याने मारली बाजी

49

कॅलिफोर्निया, ११ जानेवारी २०२३ : भारताचा आवाज आज जगापर्यंत पोचला असून, भारतीय चित्रपटसृष्टीने आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानास्पद कामगिरी केली आहे. एस. एस. राजमौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाला ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कारासाठी दोन श्रेणींमध्ये नामांकन मिळाले. तर ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला बेस्ट सॉंगचा पुरस्कारही मिळाला आहे. ‘आरारारा’ या चित्रपटातील हे गाणे २०२२ च्या हिट गाण्यांपैकी एक आहे.

या चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी नॉन इंग्लिश लँग्वेज आणि बेस्ट ओरिजनल सॉंग मोशन पिक्चरसाठी नामांकित केले गेले. ‘नाटू नाटू’ हे मूळ गाणे म्हणजेच गाण्याची तेलुगु आवृत्ती ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक किरावानी यांनी कंपोज केले आहे. तर काला भैरवा आणि राहुल सिपलीगुंज यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. ‘आरआरआर’ प्रदर्शित झाल्यापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत होता. प्रेक्षकांच्या पसंतीने हा चित्रपट अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे. त्यातच भर म्हणून मिळालेला हा सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अतिशय मोलाचा आहे.

८०वा गोल्डन ग्लोब पुरस्कार अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये बेव्हरली हिल्स येथील बेव्हरली हिल्टन येथे सुरू आहे. १२ डिसेंबर २०२२ रोजी २०२३ च्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी नामांकने घोषित करण्यात आली. या नामांकरांमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतर्फे ‘आरआरआर’ चित्रपटाला दोन श्रेणींमध्ये नामांकन दिले गेले. आणि आता संपूर्ण भारताला आपल्या तालावर नाचवणाऱ्या या चित्रपटातील गाण्याने सर्वोत्कृष्ट गाण्यांच्या श्रेणीत यश मिळविले आहे. भारतातील सर्व संगीत दिग्दर्शकांनी, गायकांनी, चित्रपटातील सर्व कलाकारांनी एस. एस. राजमौली यांचे अभिनंदन केले आहे. तर चाहत्यांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे.