मिझोराम, २९ ऑक्टोबर २०२० : केंद्र सरकारने शाळा सुरू करण्यास हिरवा कंदिल दाखवल्यानंतर मिझोराम राज्याने शाळा उघडल्या होत्या. मात्र अवघ्या आठ दिवसात अनेक विद्यार्थ्यांना कोविडची बाधा झाल्याने उघडलेल्या शाळा बंद करण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे.
मिझोराम सरकारने १६ ऑक्टोबर पासून दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू केले होते. मात्र, प्रत्यक्ष शाळा उघडल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली. त्यामुळे सोमवार २६ ऑक्टोबरपासून हे वर्ग बंद करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री लालचंदमा राल्ते यांनी घेतला आहे. शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि शिक्षक संघटनांची बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
‘दहावी, बारावीचे विद्यार्थी ऑनलाइन वर्गांनाच उपस्थित राहतील. विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षा अर्ज भरता यावेत, यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश मिझोराम शिक्षण मंडळाला देण्यात आले आहेत,’ असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. यापुढे कोणतीही अडचण आली नाही तर ९ नोव्हेंबरपासून पुन्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येतील.१२ ऑक्टोबर रोजी राल्ते यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली होती.
पुढील वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत झाला होता. मात्र, शाळा सुरू झाल्यानंतर ऐझवाल येथील एका शाळेतील दोन विद्यार्थ्यांना कोविड – १९ ची बाधा झाली. पुन्हा १८ ऑक्टोबर रोजी दक्षिण मिझोराममधील आणखी दोन विद्यार्थी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्याच दिवशी उत्तर ऐझवालमध्ये आठ विद्यार्थी आणि होस्टेल वॉर्डनना कोविडची बाधा झाली.पीटीआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, रविवारपर्यंत १५ विद्यार्थ्यांसह आणखी ५८ जण कोविड-१९ पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते.
आतापर्यंत मिझोराममध्ये कोविड रुग्णांची संख्या २,४४७ झाली आहे. परिणामी, शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: