चक्रीवादळाचा जोर वाढला! मुंबई, रायगडसह किनारपट्टी भागात धोक्याचा इशारा

मुंबई, ९ जून २०२३ : देशाच्या किनारपट्टीला ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा धोका आहे. बिपरजॉय चक्रीवादळ येत्या ४८ तासांत आणखी तीव्र होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या चक्रीवादळामुळे भारताच्या किनारपट्टी भागातही परिणाम होणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या तीन दिवसांत ‘बिपरजॉय’ तीव्र चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. या चक्रीवादळाचा परिणाम तीन दिवस दिसू शकतो. यामुळे देशाच्या किनारपट्टी भागातील आपत्ती व्यवस्थापन पथकांना आधीच सतर्क करण्यात आले आहे.

मुंबई, पालघरसह कोकण किनारपट्टी भागात या चक्रीवादळाचा परिणाम दिसू शकतो. गुजरातलाही या चक्रीवादळाचा फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील किनारपट्टी भागात मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग किनारपट्टीवर लाटा उसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने पुढे सरकरत आहे. सध्या चक्रीवादळ कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनापट्टी भागातून पुढे सरकत आहे. याचा किनारपट्टी भागात परिणाम दिसून येईल. किनारपट्टी भागात जोरदार वादळी वारे वाहतील आणि काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान विभागाने याआधीच, ८ ते १० जून दरम्यान समुद्रात उंच लाटा येण्याची शक्यता वर्तवली आहे. १२ जूनपर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा