पुणे, ४ डिसेंबर २०२३ : दोन दिवसांपासून सुरू असलेला राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप आज मागे घेण्यात आला. निवासी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाल्याने संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली.
यावेळी गिरीश महाजन यांनी निवासी डॉक्टरांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत अशी माहिती दिली. वसतिगृहासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. आंदोलन करण्यापूर्वी मला भेटा असे मी सांगितले होते. आधी भेट झाली असती तर हा प्रश्न निर्माण झाला नसता, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.
वसतिगृहांसाठी ५०० कोटींचा निधी केंद्राकडे मागितला आहे; तसेच दोन दिवसांत १ हजार ४३२ पदे भरली जाणार आहेत. भरतीचा प्रस्ताव याआधीच होता. त्याला गती देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील