नवी दिल्ली, ९ सप्टेंबर २०२२ : सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने कालच्या सुनावणीवेळी अॅटर्नी जनरल के.के.वेणुगोपाल यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या, तीन मुद्द्यांवर सुनावणी करण्यास संमती दिली आहे.
मुद्दा क्रमांक एक, १०३ व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून सरकारला आर्थिक आधारावर आरक्षण बहाल करण्याचा अधिकार प्राप्त झाला. ही दुरुस्ती घटनेच्या मूळ चौकटीच्या विरोधात आहे का ?
मुद्दा क्रमांक दोन, दुरुस्तीमुळे विनाअनुदानित शिक्षण संस्थांतील प्रवेशाचे नियम बनवण्याची मुभा मिळाली. त्यामुळेही ही दुरुस्ती घटनेच्या मूळ चौकटीचे उल्लंघन करणारी आहे का?
मुद्दा क्रमांक तीन, गरिबांच्या आरक्षणात ओबीसी, एससी, एसटी यांचा समावेश नाही. त्याआधारे ही घटनादुरुस्ती मूळ चौकटीचे उल्लंघन करणारी आहे का?
यांवर चर्चा करून योग्य निष्कर्ष काढता येईल, असे घटनापीठाने सांगितले.
आर्थिक मागासवर्गीयांना (ईडब्ल्यूएस) राखीव जागा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध दाखल झालेल्या याचिकांवर १३ सप्टेंबरपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे