तालिबानने डीजीसीएला पत्र लिहून भारताकडून हवाई सेवा सुरू करण्याची केली मागणी

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2021: अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने नागरी हवाई वाहतूक महासंचालकांना (DGCA) पत्र लिहिलं आहे.  यामध्ये भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान हवाई सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केलीय.  इस्लामिक इमिरेट घोषित झाल्यानंतर अफगाणिस्तानमधील ही पहिली अधिकृत चर्चा आहे.  असं सांगण्यात आलं आहे की तालिबानच्या या पत्राचा नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून आढावा घेतला जात आहे.
 भारताने 15 ऑगस्टपासून अफगाणिस्तानमधून व्यावसायिक उड्डाण सेवा बंद केली आहे.  तेथून भारतीय नागरिकांना आणण्यासाठी बचाव मोहिमेअंतर्गत काही विशेष विमानांना काबूल विमानतळावर जाण्याची परवानगी देण्यात आली.  तथापि, काबूलमध्ये तालिबानचं राज्य स्थापन झाल्यापासून भारताने आजपर्यंत कोणताही अधिकृत संपर्क स्थापित केला नाही, ज्यामुळं विमान सेवा सुरू करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.
माध्यमांच्या वृत्तानुसार, हे पत्र तालिबानच्या वतीने वर्तमान सरकारचे नागरी विमान वाहतूक मंत्री अल्हाज हमीदुल्ला अखुंजादा यांच्या वतीनं लिहिलं गेलं आहे.  हे पत्र 7 सप्टेंबर रोजी पाठवण्यात आलं.  अखुंजादा यांनी त्यात लिहिलं, “तुम्हाला माहीत आहे की, अलीकडेच काबूल विमानतळाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं आणि अमेरिकन सैन्य गेल्यापासून ते बंद होतं. 6 सप्टेंबर रोजी सर्व विमानतळ कर्मचाऱ्यांना नोटाम (एअरमनला नोटीस) जारी करण्यात आली.”
या पत्रात पुढं म्हटलं आहे की, “या पत्राचा उद्देश दोन देशांमधील प्रवाशांची हालचाल पूर्ववत करणं आणि आमच्या राष्ट्रीय विमानसेवा (एरियाना अफगाण एअरलाईन आणि कॅम एअर) यांना अफगाणिस्तानला उड्डाणं पुन्हा सुरू करण्यास सक्षम करणं आहे. “
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा