‘वंदे भारत’मध्ये तांबड्या-पांढऱ्या रश्श्यासह चाखता येणार महाराष्ट्रीयन पदार्थांची चव

मुंबई, ९ फेब्रुवारी २०२३ : मेल-एक्स्प्रेसमध्ये देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये बाजरी-ज्वारी-नाचणी या भरडधान्यांचा समावेश करण्यात येणार आहे. त्याची सुरवात सीएसएमटी ते शिर्डी आणि सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसमधून होणार आहे. या दोन रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांना महाराष्ट्रीयन पदार्थांची चव चाखता येणार आहे. याशिवाय महिला बचत गटांच्या खाद्यपदार्थांना प्राधान्य देण्यात येणार असल्याने महिलांना रोजगाराची नवी संधी निर्माण होईल.

सीएसएमटी शिर्डी, सोलापूर या दोन्ही रेल्वेगाड्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या आहेत. त्यामुळे या रेल्वेगाड्यांना प्रवाशांची मोठी पसंती मिळणार आहे; तसेच मुंबई ते शिर्डी हा प्रवास एका दिवसात शक्य असल्याने परदेशी पर्यटकांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. या दोन्ही रेल्वेगाड्यांमध्ये सकाळच्या नाश्त्यामध्ये साबूदाणा खिचडी, ज्वारीची भाकरी, बेसन पोळी, ज्वारीचा उपमा, शेंगदाणा चिवडा आणि भडंग असे पदार्थ आहेत.

जेवणासाठी शेंगदाणा पुलाव, भरडधान्याची उसळ असे पर्याय प्रवाशांसमोर ठेवण्यात येणार आहेत. यासह ज्वारी, बाजरी किंवा नाचणीची भाकरी प्रवाशांना मिळेल. सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रवाशांना नाश्त्यामध्ये शेगावची प्रसिद्ध कचोरी, कोथिंबीर वडी, भरडधान्यांचे थालीपीठ, साबूदाणा वडा ठेवण्यात आला आहे. मांसाहारी खवय्यांसाठी सावजी चिकन, कोल्हापुरी तांबडा रस्सा देण्यात येणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा